पालकांच्या डोकीतून उतरतेय 'इंग्रजी'चे भूत! 

Education in English
Education in English

गडहिंग्लज : गेल्या काही वर्षांत पालकांच्या डोकीत इंग्रजी माध्यमाचे भूत शिरले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थ्यांची पटसंख्या घटू लागली होती. मात्र, किमान गडहिंग्लज तालुक्‍यात तरी आता हे भूत उतरत असल्याचे समोर येत आहे.

लोकसहभागातून राबविलेले विविध उपक्रम, शिक्षकांचे कष्ट आणि अधिकारी-पदाधिकाऱ्यांचा पाठपुरावा असा 'तिहेरी उतारा' त्यावर लागू पडला आहे. यंदा इंग्रजी माध्यमातून 59 तर खासगी शाळांतून 39 विद्यार्थी जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांत दाखल झाले आहेत. तीन वर्षांपासून हा आकडा वाढत असून यंदा तो शतकासमीप पोचला आहे. 

शासनाने मागेल त्याला शाळा देण्याचे धोरण अवलंबले.त्यामुळे गेल्या काही वर्षांत इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळा वाढल्या. सहाजिकच त्याचा फटका जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांना बसू लागला. पालक-विद्यार्थ्यांचा ओढाही इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे वाढला.परिणामी, जिल्हा परिषदेच्या शाळांतील विद्यार्थी संख्या घटू लागली. एकेकाळी सर्वसमान्यांच्या आधार बनलेल्या या शाळा बंद पडतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली. 

मात्र, गेल्या तीन वर्षांत गडहिंग्लज तालुक्‍यातील परिस्थिती बदलली आहे. ज्ञानरचनावादी शिक्षण पद्धतीसह विद्यार्थीभिमूख विविध उपक्रम हाती घेण्यात आले. प्रत्येक शाळा 100 टक्के प्रगत कशी होईल, याची काळजी घेतली जात आहे. विद्यार्थ्यांचा इंग्रजी विषय चांगला होईल, याकडे कटाक्ष दिला जात आहे. जवळपास निम्म्या म्हणजे 60 शाळा डिजिटल झाल्या आहेत.शिक्षकांच्या सातत्यपूर्ण कष्टाला शिक्षण विभागाचे अधिकारी व पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या पाठपुराव्याची जोड मिळाली आहे. 

या साऱ्याचा परिपाक म्हणजे, जिल्हा परिषदेच्या तालुक्‍यातील शाळांत वर्षागणिक वाढणारी पटसंख्या. घटत्या पटसंख्येच्या पार्श्‍वभूमीवर दोन वर्षांपूर्वी 30 शाळांत विद्यार्थी वाढले होते. त्यापुढे जात गतवर्षी 52 विद्यार्थी इंग्रजी माध्यम व खासगी शाळांतून दाखल झाले. यंदा हा आकडा त्याहीपुढे गेला आहे. आतापर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळांतून तब्बल 59 तर खासगी शाळांतून 39 विद्यार्थ्यांनी पुन्हा जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची वाट धरली आहे. येत्या काही दिवसात हा आकडा अजून वाढण्याची शक्‍यता आहे. पालकांच्या विचारात होत असलेल्या बदलाचे हे चित्र जिल्हा परिषदेच्या शाळांसाठी आशादायकच म्हणावे लागेल. 

इंग्रजीतून आलेले विद्यार्थी... 
खणदाळ (8), कन्या नेसरी (3), जगतापवाडी (1), कन्या नूल (1), इदरगुच्ची (2), तावरेवाडी (1), वैरागवाडी (1), मुत्नाळ (1), बसर्गे (3), कडलगे (5), कुंबळहाळ (2), इंचनाळ (3), लिंगनूर कसबा नूल (5), शेंद्री (2), शिप्पूर तर्फ आजरा (2), कडगाव (8), मुगळी (2), गांधीनगर हलकर्णी (5), रामपूरवाडी नूल (2), जांभूळवाडी (1), केंद्रशाळा हलकर्णी (1). 

* खासगीतून आलेले विद्यार्थी... 
खणदाळ (19), जगतापवाडी (1), चंदनकूड (5), उर्दू नेसरी (13), बसर्गे (1).

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com