आश्रमशाळेत हाणामारीत विद्यार्थ्याचा मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

शंकर सावळाराम झोरे (वय 16) असे त्याचे नाव आहे. काल (मंगळवारी) रात्री झालेल्या या प्रकारात जखमी शंकरला सीपीआरमध्ये दाखल केले होते. त्याचा आज रात्री मृत्यू झाल्याचे पोलिसांनी घोषित केले. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते. 

कोल्हापूर : रजपूतवाडी (ता. करवीर) येथील माध्यमिक आश्रमशाळेत निवासी राहणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये झोपेच्या जागेवरून वाद होऊन झालेल्या हाणामारीत एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.

शंकर सावळाराम झोरे (वय 16) असे त्याचे नाव आहे. काल (मंगळवारी) रात्री झालेल्या या प्रकारात जखमी शंकरला सीपीआरमध्ये दाखल केले होते. त्याचा आज रात्री मृत्यू झाल्याचे पोलिसांनी घोषित केले. याबाबत करवीर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम रात्री उशिरा सुरू होते. 

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, रजपूतवाडी येथील माध्यमिक आश्रमशाळेत विविध ठिकाणची मुले निवासी राहतात. त्यांना झोपण्यासाठी स्वतंत्र कक्ष आहेत. या कक्षामध्येच झोपेच्या जागेवरून विद्यार्थ्यांमध्ये काल रात्री जोरदार वाद होऊन हाणामारी झाली. त्यामध्ये शंकर गंभीर जखमी होऊन बेशुद्ध पडला. हा प्रकार आश्रमशाळेच्या कर्मचाऱ्यांना समजल्यानंतर त्यांनी शंकरला सीपीआरमध्ये दाखल केले होते. उपचार सुरू असताना शंकरचा आज रात्री मृत्यू झाला.

झोरे हा आंबाईवडा (ता. शाहूवाडी) येथील रहिवासी होता. दोन वर्षांपासून तो या माध्यमिक आश्रमशाळेत राहत होता. या प्रकाराचा करवीर पोलिसांनी तपास सुरू केला असून अद्याप कोणालाही अटक केली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या आश्रमशाळेमध्ये दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाची सोय आहे. त्यामुळे परजिल्ह्यातूनही मुले येथे शिकण्यास येतात. 

Web Title: Marathi news Kolhapur news student died in clash