निमशिरगावकरांची पाण्यासाठी रात्रंदिवस भटकंती

युवराज पाटील
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

दानोळी : निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे चौदा-पंधरा दिवसांपासून गावात पाणी न आल्याने नागरिकांना पिण्याच्या व खर्चाच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. एक-दोन दिवसाच्या फरकाने नळाला येणारे पाणी तब्बल चौदा दिवसांपासून न आल्याने व पाण्याचा दुसरा पुरेसा स्त्रोत नसल्याने नागरिकांना एअरव्हॉल्व गळती, शेतातील पाणीपुरवठा चेंबर्स यावर अवलंबून राहावे लागत आहे. 

निमशिरगाव ग्रामपंचायतीने महावितरणचे मार्च 2017 नंतर वीज बिल भरलेले नाही. त्यामुळे नोव्हेंबरअखेर जवळपास 20 लाख 86 हजार रुपये थकबाकी राहिली आहे. महावितरणने अनेकवेळा नोटीस देऊनही बिल भरले गेले नसल्याले वीज कनेक्‍शन तोडले. चौदा दिवसांपासून पाणी आले नसल्याने महिला, पुरुष यांच्यासह लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांनाही पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

इतर गावच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या एअर व्हॉल्वच्या गळतीतून रात्रंदिवस पाणी भरावे लागत आहे. तसेच शेतातील चेंबरवर जेव्हा शेतीची वीज सुरू असेल त्यावेळी पाणी आणावे लागत आहे. नोकरदारवर्ग रात्री दोन वाजेपर्यंत पाणी आणत आहे. पाण्यासाठी दिवसरात्र नागरिक व महिलांना रस्त्यावर, शेतात जावे लागत आहे. 

ग्रामसेवक पी. सी. हणवते म्हणाले, "गावामधून पाणीपट्टीपोटी मागील थकीत आणि चालू येणे एकूण 15 लाख 16 हजार रुपये येणे आहे. वसुली सुरू आहे. मात्र ग्रामस्थांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नाही. ग्रामस्थांनी सहकार्य करावे. केल्यास लवकर वीज कनेक्‍शन जोडणे शक्‍य होईल.'' 

आमदार आदर्श गाव 
आमदार उल्हास पाटील यांच्या आदर्श गावमधील निमशिरगाव दत्तक गाव आहे. काही दिवसांपर्वीच आमदारांनी नळ पाणीपुरवठ्याबाबत बैठक घेतल्याचे समजते. असे असूनही त्यांच्याच दत्तक गावात 14 दिवस पाणी न आल्याने सर्वत्र चर्चा आहे. 

पाणीपट्टी भरण्यास टाळाटाळ 
चौदा दिवसांपासून ग्रामस्थ पाण्यासाठी दररोज गाडीला 50 ते 100 रुपये खर्च करतात. मात्र पाणीपट्टीची रक्कम भरण्यास टाळाटाळ करत आहेत. 

खेपेला 50 ते 100 रुपये 
येथे टेंपोतून जवळपास हजार लिटर पाणी आणण्यासाठी शंभर रुपये भाडे द्यावे लागते. ज्यांची जनावरे अधिक, त्यांना एका खेपेस शंभर रुपये मोजावे लागत आहेत.

Web Title: marathi news kolhapur news water supply in Nimshirgaon