जबरदस्त इच्छाशक्तीच करते वन्यजीव गणना 

शिवाजी यादव
रविवार, 4 फेब्रुवारी 2018

कोल्हापूर : निसर्ग अनुभवण्याची जबरदस्त इच्छाशक्ती, पदोपदी खाचखळगे पार करण्यासाठी धडधाकट आरोग्य, खडतर परिश्रमाची तयारी अशा गुणांवर वनविभागाच्या पथकाने व्याघ्र गणनेचे काम यंदाही यशस्वी केले. जंगलातील प्राणी मोजतात कसे? असा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्‍न समजून घेण्यासाठी 'सकाळ'चा प्रतिनिधी मोहिमेत सहभागी झाला. परिश्रमपूर्वक चालणाऱ्या वन्यजीव गणनेत वन पथकाला वाघिणीच्या पायाचे ठसे आढळले आणि मानवी हस्तक्षेपापासून दूरवर वन्य जीव सुरक्षित राहतात, याची खात्री झाली. 

कोल्हापूर : निसर्ग अनुभवण्याची जबरदस्त इच्छाशक्ती, पदोपदी खाचखळगे पार करण्यासाठी धडधाकट आरोग्य, खडतर परिश्रमाची तयारी अशा गुणांवर वनविभागाच्या पथकाने व्याघ्र गणनेचे काम यंदाही यशस्वी केले. जंगलातील प्राणी मोजतात कसे? असा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्‍न समजून घेण्यासाठी 'सकाळ'चा प्रतिनिधी मोहिमेत सहभागी झाला. परिश्रमपूर्वक चालणाऱ्या वन्यजीव गणनेत वन पथकाला वाघिणीच्या पायाचे ठसे आढळले आणि मानवी हस्तक्षेपापासून दूरवर वन्य जीव सुरक्षित राहतात, याची खात्री झाली. 

जांबरे (ता. चंदगड) येथे चंदगड वनविभागाचे वनाधिकारी ज्ञानेश्‍वर राक्षे, वनपाल दत्ता पाटील आणि सहभागी सहा वनरक्षकांच्या तुकडीने जांबरेच्या जंगलात वन्यजीव गणना केली. 

चंदगडपासून दहा किलोमीटरवर जांबरे धरण, अंदाजे 30 एकर जागेत धरणाचे क्षेत्र आहे. भोवताली सहा डोंगर रांगा आहेत. त्यावर गर्द जंगल पसरलेले, पायथ्याशी पथकाची गाडी थांबली. तिथून पुढे वाटाड्या म्हणून वनमजूर बुधाजी कांबळे पुढे झाले, त्यांच्यासोबत पथक चालू लागले. 

लाल मातीचे भराव, जांभा खडकाचे ढीग, घसरणाऱ्या मातीत पाय ठेवताच कपाळमोक्ष होणार असे अवघड चढ चढत, पथक जंगलाच्या घळीत पोहोचले. उन्हाची तिरीप वाढली, अर्धा तासाची पायपीट करत गेळा, पिंपळ, पळस, वड, कढीपत्ता, करंजी, कारवी, गवताची कुरणे पार करत जंगलातून रस्ते काढत कांबळेंच्या मागे पथकाची पायपीट सुरू होती. खाचखळग्यातून भिरभिरत्या नजरा टाकत पथक पुढे निघाले.

वाटेत विष्ठा दिसली, त्यात तपकिरी केसांचा पुंजका आढळला. त्यावरून बिबट्याने रानटी सशाच्या केलेल्या शिकारीचा अंदाज लागला. तसे पथक पुढे सरकले. 

गर्द जंगलातून लहान मोठ्या दगडाआडून झुळझुळ वाहणाऱ्या नितळ पाण्याचा ओढा लागला. त्यापुढे बाजूला पाण्याचे डबके लागले. तिथे लाल मातीचा चिखल, मातीचे ढीग, पथकाच्या नजरा भिरभिरल्या आणि... गुलाबाचा पाकळ्या उमटाव्यात तसे पावलांचे दोन ठसे दिसले. पथकाने पट्टीने पावलांच्या ठशांचा आकार मोजला, तो सहा इंची आकाराचा ठसा होता. बोटांच्या बाजूला निमुळती टोकं होती. पथकाने तर्क केला पूर्ण वाढ झालेल्या वाघिणीच्या पावलांचा ठसा असावा. 

सोबत घेतलेल्या कॅटलॉगमध्ये वाघ व वन्यजीवांच्या पायाचे ठसे होते. त्या ठशाशी हा ठसा शंभर टक्‍के मिळताजुळताच होता. त्यावरून वाघिणीचा ठसा असल्याची खात्री झाली. पाणथळ जागी उमटलेल्या ठशाभोवती लाकडी चौकोनी पेटी घातली. प्लास्टरचे मिश्रण तयार करून हे मिश्रण अलगदपणे ठशावर ओतले. वाळेपर्यंत पथक अर्धा तास विसावले. 

पुन्हा पायपीट सुरू झाली. गर्द झाडीतून कुरणे, दगड-गोटे, ओढे, नाले पार करत पथक धरण पाणलोटाच्या पश्‍चिमेला आले. पाणथळाकाठी पुन्हा नजरा ठसे शोधू लागल्या. वनपाल दत्ता यांना एक नव्हे, दोनतीन ठसे आढळले. पुन्हा खात्री केली. तेही वाघिणीचे ठसे होते. यांत एक अस्पष्ट तर दोन ठळक ठसे होते. पुढच्या पावलाजवळच दुसरे पाऊल होते. 

वाघीण सहा वर्षांची असावी 
यावरून पथकाने अंदाज बांधला, वाघिणीला पुढे काही तरी भक्ष्य दिसले असेल, तेव्हा ती थबकली आणि एक पाऊल पुढे लांब टाकण्याऐवजी जवळच पाऊल पडले असावे. मागील पायाचा ठसा व पुढील पायाचा ठसा यांतील अंतर पुन्हा मीटरने मोजले. ते जवळपास साडेतीन फूट भरले. यावरून वाढ झालेली वाघीण वय वर्षे किमान सहाची असावी, असा अंदाजही या पथकाने बांधला.

Web Title: marathi news kolhapur news Wild Life Tiger Counting