पुलावरुन पडून ऊस तोडणी कामगाराचा मृत्यू

प्रशांत चवरे 
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

भिगवण : आई व पत्नीस भेटून पुन्हा ऊस तोडणीच्या कामावर मोटार सायकलवरुन निघालेल्या ऊस तोडणी कामगाराचा भिगवण राशीन रोडवरील ओढ्यावरील कठड्याला धडक होऊन झालेल्या अपघातामध्ये मलठण(ता.कर्जत,जि. अहमदनगर) येथील ऊस तोडणीत कामगाराचा खोल पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी(ता.२२) दुपारी बाराच्या सुमारास घडली. प्रशासनाच्या वतीने दिवसभर तरुणाचा मृतदेह मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु होते. परंतु सहा तासांच्या प्रयत्नानंतरही सायंकाळी सहापर्यत मृतदेह मिळाला नाही.

नितीन बबन भिसे (वय.२५ रा. मलठण,ता.कर्जत, जि. अहमदनगर) असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या युवकाचे नाव आहे. याबाबत मृताचे नातेवाईक व पोलिसांनी सांगितले, की मलठण (ता.कर्जत,जि. अहमदनगर) ऊस तोडणी कामगार नितीन बबन भिसे हा त्याचे वडील बबन भिसे यांच्यासह सातारा जिल्ह्यातील गोपुज साखर कारखान्यासाठी ऊस तोडणीचे काम करत होते. नितीन भिसे हा त्याचेकडील मोटार सायकलवरुन (क्र. एम.एच.१६ बी.एस. ६०१६) गोपुज साखर कारखान्यावरुन त्याच्या मूळ गाव मलठण (ता.कर्जत, जि. अहमदनगर ) येथे आई व पत्नीस भेटण्यास गेला होता. 

नातेवाईकांना भेटून शुक्रवारी (ता.२२) दुपारी बाराच्या सुमारास परत कारखान्याकडे जात असताना भिगवण येथील जुन्या गावातील ओढ्यावरील पुलावर त्याच्या मोटारसायकलची संरक्षक कठड्याला धडक लागली. त्यामध्ये त्याचे गाडीचा पुढचा टायर फुटला व गाडी पुलावरच राहिली व नितीन हा ओढ्यातील पाण्यामध्ये पडला. त्याठिकाणी उजनी धरणाच्या फुगवट्याचे सुमारे पंधरा ते वीस फुट पाणी होते. नितीन यास पोहता येत होते. परंतु कदाचित संरक्षक कठड्याचा मार लागल्यामुळे तो जखमी झाला असण्याची शक्यता प्रत्यक्षदर्शीने व्यक्त केली.

अपघाताची माहिती मिळताच भिगवण पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक निळकंठ राठोड, पोलिस निरीक्षक भानुदार पवार, सहाय्यक फौजदार रतीलाल चौधर, मंडल अधिकारी एन.एस. गायकवाड व पोलिस व महसूल प्रशासनाच्या वतीने पाण्यामध्ये पडलेल्या नितीन भिसे याचा शोध सुरु केला. पाणबुडीच्या सहाय्यानेही त्याचा शोध घेण्यात आला. परंतु सहा तासांच्या तपासानंतरही मृतदेह मिळला नाही. शेवटी कमी प्रकाशांमुळे सायंकाळी सहा वाजता शोध थांबविण्यात आला. इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, नायब तहसीलदार एस.एम. मुंढे यांनीही घटनास्थळी भेट देऊन घटनेचा आढावा घेतला.

Web Title: marathi news local nagar news worker died bridge