तापोळ्याचे सौंदर्य पाहण्यासाठी पूल

Tapola-Nature
Tapola-Nature

महाबळेश्वर - मुंबई येथील वरळी सी-लिंकप्रमाणे शिवसागर जलाशयावर तापोळा ते अहिर असा ४८० मीटर लांब व १५ मीटर रुंदीचा केबलने जोडलेला पूल बांधण्यात येणार आहे. या पुलावर ४५ मीटर उंचीवर प्रेक्षागॅलरी तयार करण्यात येणार आहे. गॅलरीत पारदर्शक काचेवर उभे राहून पर्यटकांना या भागातील निसर्गाचा आनंद लुटण्याची संधी मिळेल. हा पूल व त्यावरील प्रेक्षागॅलरी पर्यटकांचे खास आकर्षण ठरणार आहे.  

युती शासनातील बांधकाममंत्री एकनाथ शिंदे यांनी या भागाच्या विकासाकडे जातीने लक्ष देण्यास सुरवात केली. या भागातील विकासकामे मंजूर करून त्यासाठी त्यांनी कोट्यवधी रुपयांची तरतूद केली. तापोळा- अहिर या पुलालाही त्यांनी तातडीने ७५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. या पुलाला जोडणाऱ्या रस्त्यांसाठीही मोठा निधी मंजूर केला आहे. आमदार मकरंद पाटील यांनीही या कामासाठी पाठपुरावा केला. आता लवकरच या महत्त्वाकांक्षी पुलाचे भूमिपूजन करून पुलाच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात करण्यात येणार आहे. वरळीचा सी-लिंक पूल हा चायनीज तंत्रज्ञानावर आधारित आहे. शिवसागर जलाशयावरील नियोजित पूल हा जर्मन तंत्रज्ञानावर आधारित आहे. हा पूल दोन लेनचा आहे. पुलावर दोन्ही बाजूला दोन मीटर रुंद पदपथ बांधण्यात येणार आहे. पाण्यात तीन पिलरवर पूल उभा राहील. मध्यभागी असलेल्या पायलॉनवर ४५ मीटर उंचीवर प्रेक्षकांसाठी गॅलरी बांधण्यात येईल. ही गॅलरी ३० मीटर बाय १८ मीटर एवढी मोठी असून, त्यामध्ये सुमारे २०० पर्यटकांना एकाच वेळी काचेवर उभे राहून निसर्गाचे विलोभनीय दृश्‍य पाहता येईल. या गॅलरीकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूला कॅप्सूल लिफ्ट, तसेच दोन्ही बाजूने वर जाण्यासाठी पायऱ्यांचीही सोय आहे.

पुलाचे बांधकाम व रोपचे काम संपूर्ण जर्मन तंत्रज्ञानांवर आधारित आहे. या पुलाचा आराखडा तयार करण्यात आला असून, मुख्य अभियंता प्रवीण किडे, अधीक्षक अभियंता एस. एस. माने, कार्यकारी अभियंता संजय सोनावणे व उपविभागीय अभियंता एम. एस. पाटील हे त्यावर काम करीत आहेत. 

पर्यटक वाढणार... स्थानिकांना रोजगारही!
महाबळेश्वर येथे नियमित येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे; परंतु तेच- तेच पॉईंट आणि शहर पाहून अनेक पर्यटक कंटाळले आहेत. नियमित येणारे पर्यटक हे नवीन पॉईंट अथवा आकर्षक ठिकाणाची मागणी करीत होते. अशा पर्यटकांसह देशभरातून सहलीसाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी शिवसागर जलाशयावर तयार होणार हा पूल व त्या वरील ‘व्ह्यू विंग’ गॅलरी हे नवीन आकर्षण ठरणार, हे निश्‍चित. या पुलामुळे महाबळेश्वर व तापोळा भागाला भेट देणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होण्यास मदत होईल. या भागातील पर्यटकांची संख्या वाढली, तर दुर्गम भागात रोजगारात वाढून स्थानिकांचे राहणीमान नक्कीच सुधारेल.

नियोजित पुलाची अनेक वैशिष्ट्ये...
दोन लेनचा पूल; पुलावर दोन्ही बाजूला दोन मीटरचा पदपथ
मध्यभागी असलेल्या पायलॉनवर ४५ मीटर उंचीवर प्रेक्षागॅलरी
प्रेक्षागॅलरीत २०० पर्यटकांना एकाच वेळी काचेवर उभे राहता येणार 
गॅलरीकडे जाण्यासाठी दोन्ही बाजूला कॅप्सूल लिफ्ट, पायऱ्यांचीही सोय होणार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com