ईर्ष्या? अंहं, प्रबोधन आणि लोकजागरच!!! 

सुनील कोंडुसकर
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

चंदगड : गल्लीबोळातील तरुण मंडळे आणि सामाजिक कार्याच्या नावाने त्यांच्यातील ईर्ष्या आपल्याला चांगलीच माहीत आहे. मंडळाच्या घोषवाक्‍याबरोबरच अनेकदा टी-शर्टवर लिहिलेली वाक्‍ये ईर्ष्या पेटवणारी, द्वेष वाढवणारी असतात. आसगाव (ता. चंदगड) येथील मराठा संघर्ष ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी याला फाटा देत, प्रबोधनपर घोषवाक्‍यांचा जागर केला आहे. त्यांची ही कृती इतरांसाठीही अनुकरणीय आहे. 

गणवेश परिधान केल्याने एकीचे दर्शन घडते. शाळा, महाविद्यालये, संरक्षण, सेवाक्षेत्रांत गणवेशावरून माणसाचे काम ओळखले जाते. समाजही त्याला तसा प्रतिसाद देतो. तरुण मंडळाचे कार्यकर्तेही गणवेशातून आपली ओळख दाखवत असतात. अलीकडच्या काळात एकाच प्रकारचे टी-शर्ट घालून ही एकजूट दाखवली जाते; परंतु अनेकदा टी-शर्टवरील घोषवाक्‍ये सामाजिक एकीऐवजी ईर्ष्या आणि द्वेष वाढवणारी असतात.

'नाद नाही करायचा, ....करांचा', 'एकच मंडळ, '......' मंडळ, अशा प्रकारच्या घोषवाक्‍यांची ईर्ष्या गावातून गल्लीपर्यंत पोचते. 'पहिलं आम्हीच' असं एकजण लिहितो, तर 'अंहं! पहिलं आम्हीच' असे प्रत्युत्तर दिले जाते. यातून उद्दिष्ट साध्य करण्याऐवजी केवळ स्पर्धेचे दर्शन घडते. आसगाव येथील तरुणांनी याला फाटा देत प्रबोधन आणि लोकजागर करणारी उद्‌बोधन करणारी वाक्‍ये लिहिली आहेत.

'जात-पात तोडा, भेदभाव तुम्ही सोडा', 'प्रदूषण हटवा, पर्यावरण वाचवा', 'मुलगा-मुलगी भेदभाव नको, मुलगी झाली खेद नको', 'व्यसनाचा करू धिक्कार, विकासयोजनेला लावू हातभार', 'गाडगेबाबाला मानूया, स्वच्छतेला जाणूया' अशा प्रकारची घोषवाक्‍ये लिहिली आहेत. तरुणांचे स्फूर्तिस्थान छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे चित्र एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ही घोषवाक्‍ये लक्ष वेधतात. मंडळाचे कार्याध्यक्ष तानाजी गावडे, ज्येष्ठ सदस्य शरद गावडे, शिवाजी गावडे, उपाध्यक्ष शरद गावडे, पवन गावडे, अशोक साबळे, शिवाजी गावडे, भरत गावडे, गजानन गावडे, गणपत साबळे, रमेश कांबळे यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही घोषवाक्‍ये इतर मंडळांनाही प्रेरणादायी आहेत. 

केवळ आर्थिक देवघेवीतून केलेले समाजकार्य परिपूर्ण नसते. पायाभूत समाजव्यवस्था घडवण्यासाठी लोकप्रबोधन आणि लोकजागर महत्त्वाचा ठरतो. आम्ही ते करण्याचा प्रयत्न करीत आहोत. 
- तानाजी गावडे, अध्यक्ष, मराठा संघर्ष ग्रुप, आसगाव

Web Title: marathi news marathi website kolhapur news