पूररेषेतील बांधकामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष 

युवराज पाटील
मंगळवार, 8 ऑगस्ट 2017

शिरोली पुलाची : येथील पूररेषेतील बांधकामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आसल्याचे चित्र आहे. यामुळे हिरव्यापट्टयात विविध शोरुम उभारली असून, त्यांनी टाकलेल्या भरावामुळे सुमारे शंभर एकर शेती क्षारपड होण्याची शक्‍यता आहे. 

शिरोली पुलाची : येथील पूररेषेतील बांधकामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आसल्याचे चित्र आहे. यामुळे हिरव्यापट्टयात विविध शोरुम उभारली असून, त्यांनी टाकलेल्या भरावामुळे सुमारे शंभर एकर शेती क्षारपड होण्याची शक्‍यता आहे. 

राष्ट्रीय महामार्ग, औद्योगिक वसाहतीमुळे शिरोलीचा विस्तार झपाट्याने झाला. मूळ गावाच्या सभोवती नविन वसाहती वसल्या. ट्रान्स्पोर्ट, हॉटेल, आटोमोबाईल शोरुम, फर्निचर व टाईल्स शोरुम असे विविध व्यावसाय सुरु झाले. परिणामी येथील जागेचे दर वाढले. तरीही जागेची कमतरता जाणवू लागली. यामुळे अनेक व्यावसायीकांची नजर शेतजमिनीवर पडली. त्याही कमी पडल्यामुळे पूररेषेतील जागा व्यावसायीकांच्या नजरेत आली.

पूराचे पाणी तेथे येते. त्यामुळे व्यवसायाचे नुकसान होणार हे माहित असतानाही केवळ महामार्गालगतची जागा म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले. त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात भराव टाकला जात आहे. भराव खचू नये, यासाठी सिमेंड कॉक्रीट, दगडी भिंती उभारल्या आहेत. त्यामध्ये एमआयडीसीतील वेस्ट सॅण्ड, मुरुम यांचा भराव टाकून बांभकाम केले आहे. यामुळे बाजूच्या शेतजमिनीत पाणी साचून राहते. यामुळे त्या जमिनी क्षारपड होण्याची शक्‍यता कृषी तज्ञांनी व्यक्त केली. 

पूररेषेतील बांधकामामुळे महामार्गाच्या दोन्ही बाजूस इमारती उभ्या राहण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. यामुळे पुराचे पाणी नागरी वसाहतीमध्ये शिरण्याचा धोका आहे. तालुका व जिल्हा प्रशासनाने याबाबत कडक भूमिका घ्यावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे. 

शोरुमच्या बाजूची शेतामध्ये पाणी 
पूररेषेत महामार्गालगत फर्निचरचे मोठे शोरुम आहे. गेल्यावर्षी पूराचे पाणी तेथे शिरले होते. त्यामुळे शोरुम बंद होते. याकालावाधीत शोरुममध्ये पुन्हा भराव टाकून आतून उंची वाढवली. त्यामुळे बाहेर पाणी जादा साचून राहिले; मात्र शोरुममध्ये पाणी येणार नाही याची काळजी शोरुम मालकांनी घेतली. काही दिवसापूर्वी प्रांताधिकारी समीर शिंगटे यांनी शोरुमला भेट दिली. त्यावेळी मालकांने या गोष्टीला दुजोरा दिला होता. 

शोरुमचे मालकास पुराची भीती 
पूररेषेत एक ट्रॅक्‍टरचे शोरुम आहे. यावर्षी पंचगंगेचे पाणी पात्राबाहेर पडल्यानंतर, शोरुमजवळ पाणी आले होते. पावसाचा जोर वाढल्यास, पाणी शोरुममध्ये शिरले असते. या भीतीने शोरुमचे मालक रात्री-अपरात्री शोरुमला भेट देत होते. 

परवाना कोणत्या आधारावर दिला? 
2005 च्या महापूरानंतर जिल्हा प्रशासनाने पूररेषा निश्‍चित केली आहे. पूररेषेच्या आतील जागा ही हिरव्या पट्टयात निश्‍चित केली होती. तरीही येथील काही जागा जिल्हा प्रशासनाने व्यावसायीक बिगर शेती (कमर्शिअल एन ए) केली आहे. हा परवाना जिल्हा प्रशासनाने कोणत्या अधारावर दिला असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. 

अधिकारी बदल्यानंतर... 
पूररेषेतील बांधकाम म्हणून तात्कालीन नायब तहसीलदार रणजीत देसाई यांनी कृष्णा मार्बलची इमारत जेसीबीच्या सहाय्याने पाडली होती. त्याठिकाणी सुरु असलेले शोरुमही बंद पाडले होते. अधिकारी बदलले आणि पुन्हा ते शोरुम सुरु झाल्याचे चित्र आहे. 

पूररेषेतील बांधकाम गावासाठी धोकादायक आहे. महामार्गालगतच्या जागेवर शोरुम उभारली जातील; मात्र आतील शेतकऱ्यांच्या जमिनी नापीक होतील. यामुळे याबाबत जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी व तहसीलदार यांच्याकडे तक्रार करणार आहे. 
- दिपक यादव, जिल्हाध्यक्ष, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष. 

पूररेषेतील बांधकामाबात नोटीस लागू केल्या आहेत; मात्र या नोटीसला त्यांनी कोणतेही उत्तर दिलेले नाही. 
- नितीन कांबळे, तलाठी, शिरोली पुलाची.

Web Title: marathi news marathi website kolhapur news national highway