हेल्मेट घालणाऱ्यांना सांगलीत गुलाबपुष्प 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 16 जुलै 2017

सांगली : शहरातील हेल्मेट सक्ती मागे घेतली असली तरी आज अनेक दुचाकीस्वारांनी हेल्मेट घालून सुरक्षित प्रवासाचा संदेश दिला. हेल्मेट घातलेल्या दुचाकीस्वारांचे वाहतूक पोलिसांनी गुलाबपुष्प देऊन स्वागत केले. हेल्मेटधारी स्वारांना वाहतूक पोलिसांनी चक्क शिट्टी मारून हात केल्यानंतर अनेकजण गोंधळले. परंतु गुलाबपुष्प दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. 

कोल्हापूर परिक्षेत्रात 15 जुलैपासून हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी केली जाईल, असे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी जाहीर केले होते. परंतु अनेकांनी या सक्तीला विरोध केला. शहरात वाहनांचा वेग मर्यादित असल्यामुळे शहरात नको फक्त राज्य व राष्ट्रीय महामार्गावर हेल्मेट सक्ती केली जावी अशी मागणी केली. त्यामुळे हेल्मेट सक्ती मागे घेतली. राज्य व राष्ट्रीय महामार्गावर मात्र हेल्मेट सक्ती कायम राहील असे स्पष्ट करतानाच आधी प्रबोधन मग सक्ती केली जाईल, असेही सांगण्यात आले. 

नेहमी नाकाबंदीचा पॉईंट असलेला कर्मवीर चौक पोलिसांनी निवडला. हेल्मेट घातलेला दिसला की पोलिसांची शिट्टी वाजू लागली. हेल्मेट घालूनही शिट्टी वाजवल्यामुळे अनेकजण गोंधळले. शिट्टीचा आवाज ऐकून अनेकजण थांबून वैतागलेला चेहरा करत होते. परंतु पोलिसांनी पावती पुस्तक काढण्याऐवजी हातात गुलाबपुष्प दिल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर हासू उमटले. 

अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे, विश्रामबागचे निरीक्षक राजेंद्र मोरे, वाहतूक नियंत्रण शाखेचे सहायक निरीक्षक अतुल निकम आणि वाहतूक पोलिसांनी हेल्मेटधारी दुचाकीस्वारांना गुलाबपुष्प दिले. वाहतूक शाखेच्या महिला पोलिसांनी देखील हेल्मेटधारी महिलांचे स्वागत केले. पोलिसांचा अनोखा उपक्रम पाहून अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला. वाहतूक पोलिसांनी दिवसभरात अन्य चौकात आणि रस्त्यावरही गुलाबपुष्प देऊन हेल्मेटधारी चालकांचे स्वागत केले.

Web Title: marathi news marathi website Sangli Traffic Helmet