धोकादायक इमारतीमुळे 105 विद्यार्थी शिकताहेत शाळेबाहेर! 

मार्तंडराव बुचुडे
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

आमच्या शाळेची भिंत रात्रीच्या वेळी पडली नाही, तर काहीही अघटित घडले असते. या शाळेत अतिशय गोरगरीबांची आणि सर्वसामान्यांची मुले शिक्षण घेत आहेत. त्यांची गैरसोय झाली आहे. मंदिरात अनेक भाविक दिवसभर दर्शनासाठी येत असतात. त्यांच्या येण्याजाण्यामुळे मुलांच्या शिक्षणात व अभ्यासात व्यत्यय येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने लवकरात लवकर वर्गखोल्या बांधून द्याव्या. 
- उत्तमराव पठारे, सरपंच, वाळवणे 

 सुपे : पारनेर तालुक्‍यातील वाळवणे येथील शाळेची इमारत अतिशय धोकादायक झाली आहे. जिल्हा परिषद आणि शिक्षण विभागाला गेल्या तीन वर्षांपासून यासंदर्भात माहिती देऊनही याची दखल घेतली गेलेली नाही. या धोकादायक इमारतीची एक भिंत पावसामुळे कोसळू लागल्याने या शाळेतील सुमारे 105 विद्यार्थी कशी शाळेच्या प्रांगणात, तर कधी ग्राम दैवत भैरवनाथाच्या मंदिरात शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. 

वाळवणे येथे पहिली ते चौथीसाठी जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे. या शाळेत 105 विद्यार्थी शिक्षण घेत असून चार शिक्षक आहेत. या शाळेची इमारत 1951 मध्ये बांधण्यात आली आहे. 67 वर्षांपूर्वीची ही इमारत आता विद्यार्थ्यांना बसण्यासाठी धोकादायक झाली आहे. यासंदर्भात शिक्षण विभाग आणि जिल्हा परिषदेला यापूर्वीच कळविण्यात आले होते. मात्र, सरकारी यंत्रणा अद्यापही जागी झालेली नाही. 

29 ऑगस्ट रोजी रात्री झालेल्या पावसात शाळेच्या इमारतीचा एक कोपरा पडला. त्यामुळे मुलांना तिथे बसविणे बंद करण्यात आले आहे. सध्या मुले शाळेच्या प्रांगणात शिकतात. पाऊस आला किंवा मुलांना ऊन लागू लागले, की भैरवनाथाच्या मंदिरात मुलांना बसविले जाते. 

Web Title: marathi news marathi websites Education News