मावळच्या सह्यकड्यांवर बहरला फुलोत्सव

मावळच्या सह्यकड्यांवर बहरला फुलोत्सव

तळेगाव स्टेशन : पावसाळ्यानंतर हिरवाईने नटलेल्या पश्चिम घाटाच्या सह्यकड्यांवर आणि आजूबाजूला डोंगर टेकड्यांवर फुललेल्या रंगीबेरंगी रानफुलांनी,गणरायाला निरोप देताना हळव्या झालेल्या मनावर चैतन्य पेरले आहे.नवरात्रीच्या नांदीला जिकडे तिकडे चोहीकडे फुललेल्या रानफुलांमुळे मावळच्या सह्यकड्यांवर जणू फुलोत्सवच बहरल्याचे चित्र आहे.

अलीकडच्या काळात मावळात झपाट्याने फैलावणाऱ्या सिमेंटच्या जंगलामुळे निसर्ग नवलाईला ग्रहण लागले असले तरी,पावसाळ्यानंतर मावळात बहरणारी हिरवळ आणि रानफुले निसर्गप्रेमींना नवी उभारी देऊन जातात.भाद्रपद ते कार्तिक असा साधारणतः तीन महिन्यांचा कालावधी म्हणजे रानफुलांच्या बहराचा.मावळच्या सह्यकड्यांवर बहरलेला हा फुलोत्सव पाहण्यासाठी कुणाच्या विशेष निमंत्रणही आपल्याला गरज नाही.दवबिंदूंची दुलई पांघरलेल्या हिरवाईच्या मधून वाट काढत जाणारे मावळातील रस्ते आणि त्यांच्यावर शिंपडलेली रानफुले सध्या मनाला भुरळ घालत आहेत.अगदी छोटी छोटी कास पठारेच जणू जागोजागी अवतरल्याचा भास होतो.

साधारणतः घटस्थापनेच्या अगोदर आठवडाभर जागोजागी दिसणाऱ्या रानफुलांच्या कळ्या कधी फुलाचे रुपडे घेऊन हिरव्यागार रानावनाला कोंदण घालतात ते कळत नाही.रंग,रुप,गंध,आकार,रचना आदींबाबत विविधता असलेल्या प्रत्येक फुलाचे स्वतःचे वेगळेच वैशिष्ट्ये.हालचालीसुद्धा अगदी नाना तऱ्हेच्या.घाणेरी सारखी काही झुबक्यांच्या झुंडीत एकमेकांना बिलगलेली तर काही एकटी असूनही वाऱ्यासोबत तोऱ्यात डोलणारी. सोनकुसुम, रानझेंडू, कुर्डु अर्थात कोंबडा, सोनकी, रानहळद, तेरडा, दशमुळी, विविध रंगछटांची घाणेरी, शंकासूर, कारवी, विष्णुक्रांत, आरटी, सोनतराड आणि आणखी खूप डोळ्यांना सुखावणारी. दुरुनच लक्ष वेधणारी ही फुले दोन तीन आठवडे रंगाची मुक्त उधळण करीत राहतात,जणू काही दिवाळीपूर्वीच फुलोत्सव.

आसमंतात सगळीकडे दरवळणारा मनमोहक सुगंध.भल्या सकाळी तळेगाव दाभाडे परिसरातील डोंगर टेकड्यांवरची मंद धुक्याची किनार आणि त्याखाली रानफुलांनी कुंपण घातलेले हमरस्ते, रेल्वेमार्ग,पायवाटा, डोंगरदऱ्या,नदीकिनारे  ते थेट कडे-कपारी,कातळातही फुलून आलेली रानफुले कोवळ्या उन्हात न्हाऊन निघताना पाहून मन अगदी उल्हासित होते.रानफुलांची मांदियाळी जमलेली खेड-मावळच्या सीमेवरील आंदरमावळातली वरसूबाईची डोंगररांग,भामचंद्र,तुकोबांचा भंडारा डोंगर,घोरवडेश्वराचा डोंगर,नाणोली फिरंगाईचा डोंगर तसेच आजूबाजूच्या छोटीमोठ्या बोडख्या डोंगर टेकड्या  दरम्यानच्या काळात निसर्गाचा अद्भुत नजराणा घेऊनच पर्यटकांना खुणावतात.

सगळीकडे पांघरलेली हिरवळ आणि हिरवळीच्या अंगाखांद्यावर डोलणाऱ्या लाल,पिवळ्या,गुलाबी,निळ्या, जांभळ्या, पांढऱ्या रंगीबेरंगी रानफुलांचा साज त्यावर मध गोळा करण्यासाठी मुक्तछंद बागडणारे आवारा भवरे,मधमाश्‍या,फुलपाखरे,मुंगळे पाहून साहजिकच ताणतणाव कुठल्या कुठे विरुन जातो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com