'त्या' शिक्षिकांना 'सीईओं'मुळे न्याय!

विशाल पाटील
शनिवार, 2 सप्टेंबर 2017

सातारा : महिला शिक्षिका, त्यात काही घटस्फोटीत, आजी सैनिकाची पत्नी, कोण अपंग, दुर्धर आजारग्रस्त... तरीही ग्रामविकास विभागाच्या निर्णयामुळे अतिदुर्गम शाळांत पदस्थापना मिळाली. सातत्याने पाठपुरावा करूनही काहीच होत नव्हते. अखेरचा प्रयत्न म्हणून मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्या निरोप समारंभात भेटल्या. महिला शिक्षिकांचे रुदन पाहून सत्कारास उपस्थितीत असलेल्या सौ. विजया देशमुख यांनाही रडू आवरले नाही. त्यांनी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सीईओंकडे गळ घातली. कार्यक्रमातून बाहेर पडताच सीईओंनी ग्रामविकास विभागाच्या सचिवांशी संपर्क साधला.

सातारा : महिला शिक्षिका, त्यात काही घटस्फोटीत, आजी सैनिकाची पत्नी, कोण अपंग, दुर्धर आजारग्रस्त... तरीही ग्रामविकास विभागाच्या निर्णयामुळे अतिदुर्गम शाळांत पदस्थापना मिळाली. सातत्याने पाठपुरावा करूनही काहीच होत नव्हते. अखेरचा प्रयत्न म्हणून मावळत्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना त्या निरोप समारंभात भेटल्या. महिला शिक्षिकांचे रुदन पाहून सत्कारास उपस्थितीत असलेल्या सौ. विजया देशमुख यांनाही रडू आवरले नाही. त्यांनी हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सीईओंकडे गळ घातली. कार्यक्रमातून बाहेर पडताच सीईओंनी ग्रामविकास विभागाच्या सचिवांशी संपर्क साधला. सुधारित पत्र आले अन्‌ तत्काळ 27 शिक्षकांना नव्याने पदस्थापना दिली गेली. 

आंतरजिल्हा बदलीने सातारा जिल्हा परिषदेत आलेल्या 148 शिक्षकांच्या प्रथम 27 जुलैला ऑनलाइन समुपदेशन पद्धतीने समायोजन करण्यात आले. ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांच्या पत्रानुसार त्यांना प्राधान्याने अवघड क्षेत्रातील (दुर्गम) शाळांत पदस्थापना दिली. त्यानंतर या शिक्षकांनी 'सीईओ' डॉ. राजेश देशमुख, पदाधिकाऱ्यांकडे सातत्याने पाठपुरावा केला. गेल्या महिन्यात स्तनदा व गरोदर माता अशा 19 शिक्षकांना सोयींच्या शाळा पदस्थापना मिळाली. मात्र, या प्रक्रियेत संवर्ग एकमधील महिलांना अतिदुर्गम शाळांत जावे लागले होते. 

डॉ. देशमुख यांचा गुरुवारी निरोप समारंभ झाला. या वेळी हे 23 महिलांसह 27 शिक्षक उपस्थित राहून कार्यक्रम संपाताच सीईओंपुढे गाऱ्हाणे मांडले. त्याच वेळी सौ. देशमुख यांना महिलांचे रुदन पाहून राहवले नाही. त्यांच्याही डोळ्यात अश्रू तराळले. त्यांनी डॉ. देशमुखांना हा प्रश्‍न सोडविण्यासाठी गळ घातली. त्याची दखल घेत त्यांनी कार्यक्रमानंतर असीम गुप्ता यांच्याशी संपर्क साधत नव्याने पत्र काढण्याची मागणी केली. तसेच शुक्रवारी सकाळी ग्रामविकास विभागाचे अवर सचिव प्रि. शं. कांबळे यांच्याशीही सातत्याने संपर्क साधला. त्यानुसार कांबळे यांनी संबंधित शिक्षकांना नव्याने रिक्‍त पदावर पदस्थापना द्यावी, असे पत्रक आज दुपारी चार वाजता पाठविले. यानंतर तत्काळ शिक्षण विभागाने या शिक्षकांना ऑनलाइन समुपदेशन पद्धतीने पदस्थापना दिले. 

शनिवारी सुट्टी असतानाही डॉ. देशमुख, कृषी सभापती मनोज पवार, प्राथमिक शिक्षणाधिकारी पुनीता गुरव यांनी शिक्षिकांना आदेश दिले. या प्रसंगी संबंधित शिक्षकांच्या डोळ्यात आनंदाश्रूही तरंगत होते. सीईओंनी केलेल्या पाठपुरावामुळे हे साध्य झाले असून, आम्ही मिळालेल्या शाळांमध्ये गुणात्मक प्रगती करून प्रशासनाचे ऋण फेडू, अशी ग्वाहीही शिक्षकांनी दिली. 

सौ. देशमुख यांनी बदलीसाठी प्रयत्न केल्याची माहिती मिळताच सर्व शिक्षिका सीईओंच्या निवासस्थानी गेल्या. तेथे त्यांना पेढे, पुष्पगुच्छ देऊन त्यांचे आभारही त्यांनी मानले. सीईओंनी कार्यभार सोडतानाही आपला प्रश्‍न सोडविल्याने 27 शिक्षकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळत होते.

Web Title: marathi news marathi websites Satara News satara jilha parishad Vishal Patil