मायणी तलावाच्या बांधाला वाळू उपशामुळे धोका 

मायणी तलावाच्या बांधाला वाळू उपशामुळे धोका 

मायणी - येथील मायणी तलावालगत सुरू असलेल्या वाळू उपशाने तलावाच्या बांधालाच धोका होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. शेती व शेत विहिरीही अडचणीत येत आहेत. महसूल विभागाच्या पथकांकडून ठोस कारवाई होत नसल्याने वाळू चोरट्यांकडून दररोज शेकडो घनफूट रान ओरबडले जात आहे. त्यासाठी पोलिस व महसूल विभागाने हातात हात घालून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी करीत आहे. 

येथील मायणी तलाव परिसर, चांद नदी, चितळी व गुंडेवाडी हद्दीतील येरळा नदीत वाळूचोरांनी धुमाकूळ घातला आहे. गेल्या काही दिवसांपासून तलाव परिसरात मोठ्या प्रमाणात वाळूउपसा सुरू आहे. सध्या तुटवडा असल्याने वाळूला प्रचंड मागणी आहे. परिणामी वाळू व्यावसायिक मिळेल तेथून वाळूचा उपसा करीत आहेत. जेसीबीच्या साह्याने तलाव परिसर पिंजून काढला आहे. वाळूचा साठा दिवस-रात्र शोधला जात आहे. रात्रभर वाळूचा उपसा सुरू असून दररोज किमान 100 ते 200 चौरस फुटांच्या खड्ड्यांची भर पडत आहे. तलावाच्या मुख्य बांधापासून केवळ 100 फुटांवर दररोज खड्डे पडत आहेत. त्यामुळे बांधालाच धोका होण्याची शक्‍यता व्यक्त होत आहे. 

जलवाहिनी उघडी, विहिरींवर परिणाम 
वाळू उपशामुळे सार्वजनिक पाणीपुरवठ्याची जलवाहिनीही उघडी पडली आहे. त्या परिसरातील शेती व विहिरींवरही विपरीत परिणाम होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत. असाच वाळूउपसा सुरू राहिला तर तलावाच्या बांधाला धोका होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत वाळूउपसा व वाहतुकीवर नियंत्रण मिळवणे आवश्‍यक आहे. 

पाहणी अन्‌ कारवाईकडे दुर्लक्ष 
नुकतीच तहसीलदार सुशील बेल्हेकर यांनी वाळूउपसा होत असलेल्या भागाची पाहणी केली. वाळूउपसा होऊन परिसरात पडलेले खड्डे पाहून त्यांनीही आश्‍चर्य व्यक्त केले. तलावाखालील बाजूला सुरू असलेला वाळूउपसा चिंताजनक असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. केवळ एखाद-दुसरी वाळूची गाडी अडवून दंडात्मक, तोंडी कारवाई करून चालणार नाही. वाळूउपसा करणाऱ्यांना कायद्याची, प्रशासनाची धडकी भरावी, अशी कठोर कारवाई करण्याची गरज आहे. काही शेतकऱ्यांनी तहसीलदार व जिल्हाधिकाऱ्यांकडे लेखी तक्रारीही केल्या आहेत. मात्र, काही केल्या वाळू तस्करी थांबत नसल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. अधिकाऱ्यांनी वाळू तस्करांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. 

मायणी परिसरातही बेसुमार उपसा 
मायणी तलाव परिसरासह तलावास मिळणाऱ्या कलेढोण, विखळे व भिकवडी ओढ्यांतही वाळूचा बेसुमार उपसा सुरू आहे. तसाच उपसा चितळी, शेडगेवाडी, गुंडेवाडी, मोराळे, अंबवडे या भागांतही सुरू असल्याचे दिसते. मात्र, काही अधिकारी व स्थानिक नेते मंडळींकडून अभय मिळत असल्याने वाळू तस्करांचे चांगलेच फावले आहे. काही गावांमध्ये तर गावाचा कारभार करणाऱ्या मंडळींच्या जवळचेच लोक वाळूचा उपसा करीत असल्याची चर्चा आहे. त्यामुळे नागरिक तोंडावर बोट ठेवत आहेत. काही जागरुक व संवेदनशील नागरिकांकडून वाळू उपशाबाबत तलाठी, पोलिस व तहसीलदारांना कळवले जाते. मात्र, त्यांच्याकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याचा अनुभव आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com