ठाण्यात वेगवेगळ्या अपघातात तिघे ठार, एक गंभीर जखमी

दीपक शेलार
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

मुंब्रा, आनंद कोळीवाडा येथे राहणारा शोएब मेमन (22) हा तरुण शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून मुंब्रा स्टेशनवरून कौसा येथे जात होता. तेव्हा भरधाव डंपरची दुचाकीला पाठीमागून बसलेल्या धडकेत शोएब गंभीर जखमी झाला. त्याला कळवा रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

ठाणे : ठाण्यात एकाच दिवशी तीन विविध ठिकाणी झालेल्या अपघातात तिघे दुचाकीस्वार ठार झाले असून, तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.2) घडली.

याप्रकरणी मुंब्रा, कापुरबावडी आणि कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले असून, ओमप्रकाश सरोज (27) आणि रंगीलाल गौतम (55) या दोघा डंपरचालकांना अटक केली आहे. तर कापुरबावडीच्या अपघातातील अज्ञात ट्रकचालकाने पळ काढला, अशी माहिती पोलिस नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली.

मुंब्रा, आनंद कोळीवाडा येथे राहणारा शोएब मेमन (22) हा तरुण शुक्रवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास आपल्या दुचाकीवरून मुंब्रा स्टेशनवरून कौसा येथे जात होता. तेव्हा भरधाव डंपरची दुचाकीला पाठीमागून बसलेल्या धडकेत शोएब गंभीर जखमी झाला. त्याला कळवा रुग्णालयात उपचारासाठी नेत असतानाच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.

याप्रकरणी मुंब्रा पोलिसांनी पळून गेलेल्या ओमप्रकाश सरोज (27) रा.वरळी,मुंबई या डंपरचालकाला अटक केली. दुसऱ्या घटनेत घोडबंदर रोडवरील गायमुख चौपाटीवर पर्यटनासाठी कल्याण पूर्वेकडील विपूल जाधव आणि निखिल बागडे हे दोघे मित्र शुक्रवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून निघाले होते. तेव्हा गायमुख वळणावर त्यांच्या दुचाकीला भरधाव डंपरची पाठीमागून धडक बसली. यात जाधव जागीच ठार तर बागडे हा गंभीर जखमी झाला. याप्रकरणी कासारवडवली पोलिसांनी डंपरचालक रंगीलाल गौतम (55) रा.कांदिवली याला अटक केली.

तिसरी घटना शुक्रवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास मुंबई-नाशिक महामार्गावर घडली. लोढा संकुलासमोर ट्रकला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ट्रकची धडक बसून 50 वर्षीय दुचाकीस्वार ट्रकच्या मागील चाकाखाली चिरडून जागीच ठार झाला. मृताची अद्याप ओळख पटली नसून, अज्ञात ट्रकचालकाचा शोध कापुरबावडी पोलिस घेत आहेत.

Web Title: Marathi News Mumbai News Road Accident Thane news Three Died