नगर जिल्हा बॅंकेची नोकरभरती अखेर रद्द 

डॉ. बाळ ज. बोठे पाटील
गुरुवार, 1 मार्च 2018

नगर - नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वादग्रस्त ठरलेली नोकरभरती अखेर रद्द करण्याचा आदेश सहकार खात्याचे विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी आज जारी केला. भरतीप्रक्रिया योग्य रीतीने व नियमानुसार पार पाडली जाते किंवा नाही, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांची होती. तथापि, त्यांनी ही जबाबदारी पाड पाडण्याच्या कामात कसूर केल्याचा ठपका वर्पे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही बॅंकेने तात्काळ कारवाई करावी, असे भालेराव यांच्या आदेशात म्हटले आहे. "सकाळ'ने या प्रकरणाचा तड लागेपर्यंत पाठपुरावा केला. 

नगर - नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेची वादग्रस्त ठरलेली नोकरभरती अखेर रद्द करण्याचा आदेश सहकार खात्याचे विभागीय सहनिबंधक मिलिंद भालेराव यांनी आज जारी केला. भरतीप्रक्रिया योग्य रीतीने व नियमानुसार पार पाडली जाते किंवा नाही, यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे यांची होती. तथापि, त्यांनी ही जबाबदारी पाड पाडण्याच्या कामात कसूर केल्याचा ठपका वर्पे यांच्यावर ठेवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांच्यावरही बॅंकेने तात्काळ कारवाई करावी, असे भालेराव यांच्या आदेशात म्हटले आहे. "सकाळ'ने या प्रकरणाचा तड लागेपर्यंत पाठपुरावा केला. 

हजारे यांचा चार वेळा पत्रव्यवहार 
बॅंकेने प्रथम श्रेणी अधिकारी, द्वितीय श्रेणी अधिकारी, ज्युनिअर ऑफिसर व लेखनिक अशा एकंदर 465 पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविलेली होती. भरतीप्रक्रियेसाठीची लेखी व तोंडी परीक्षेसह सर्व सोपस्कार पूर्ण करून भरतीची निवड यादी तयार करण्यात आली. त्यामध्ये पदाधिकारी व अधिकाऱ्यांची मुले, नातेवाईक असल्याचे वृत्त "सकाळ'ने सर्वप्रथम देऊन या प्रकरणाचा पाठपुरावा करणाऱ्या तब्बल 17 बातम्या प्रसिद्ध केल्या. दरम्यान, ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बातम्यांच्या कात्रणांसह मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांकडे पाठपुरावा केला. त्यासंदर्भात सकाळच्या संदर्भासह अण्णांनी तब्बल चार वेळा मुख्यमंत्री, सहकारमंत्री, सहकार सचिव, सहकार आयुक्त, नाशिकचे विभागीय सहनिबंधक आदींशी पत्रव्यवहार केला. कोणत्याही परिस्थितीत ही भरती रद्द होऊन नव्याने भरती करण्यात यावी, या मुद्द्यासह भरतीप्रक्रियेतील विविध अनियमितता व गैरव्यवहार "सकाळ'ने चव्हाट्यावर आणला. 

पथकाकडून हजार पानांचा चौकशी अहवाल 
या सर्व बाबींची दखल घेऊन सहकार खात्याने भालेराव यांना 6 नोव्हेंबर 2017 रोजी चौकशीचा आदेश दिला. भालेराव यांनी तातडीने नगर तालुक्‍याचे सहकार उपनिबंधक राम कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली संगमनेरचे उपनिबंधक जयेश आहेर, श्रीगोंद्याचे सहायक निबंधक रावसाहेब खेडकर व नेवाश्‍याचे सहायक निबंधक दीपक नागरगोजे यांच्या पथकाची स्थापना करून त्यांनी ही चौकशी करण्याचे निर्देश दिले. या पथकाने चौकशी सुरू करताच राजकीय व प्रशासकीय पातळीवरून त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात दबाव आणण्यात आला. तथापि, सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी पथकाला कोणत्याही दबावाला बळी न पडता चौकशी करण्यास सांगितले. त्यामुळे पथकाने सखोल चौकशी करून सुमारे एक हजार पानांचा अहवाल विभागीय सहनिबंधकांना गेल्या 17 जानेवारीला सादर केला. 

भरतीप्रक्रिया सदोष व गैरहेतूने प्रेरित 
विभागीय सहनिबंधकांनी याबाबत सहकार आयुक्तांकडे मार्गदर्शन मागितले. दरम्यान, या अहवालानुसार भरती रद्द होण्यासाठी कारवाई होऊ नये, यासाठी बॅंकेवर वर्चस्व असलेली राजकीय मंडळी व प्रस्थापित नेते देव पाण्यात घालून बसले होते. थेट मुख्यमंत्री व सहकारमंत्र्यांवर दबाव आणण्याचा खटाटोपही त्यांनी केला; परंतु तो व्यर्थ ठरला. सहकार आयुक्त विकास झाडे यांच्या निर्देशानुसार विभागीय सहनिबंधकांनी आज बॅंकेची भरती रद्द करण्यात येत असल्याचा आदेश काढला. त्यासंदर्भात बॅंकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांना हा आदेश बजावण्यात आला आहे. चौकशी अहवालानुसार बॅंकेच्या नोकरभरती प्रक्रियेत अनियमितता झाली आहे. सहकार आयुक्तांकडे चौकशी अहवाल गेल्यानंतर त्यांनी ही भरतीप्रक्रिया पारदर्शक व मार्गदर्शक सूचनांप्रमाणे राबविण्यात आली नाही. त्यामुळे ती सदोष व गैरहेतूने प्रेरित असल्याचे स्पष्ट होत आहे, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे. बॅंकेने ही भरती रद्द करून त्याबाबतचा अहवाल तातडीने सादर करावा, असेही आदेशात म्हटले आहे. 

नगर जिल्हा बॅंकेच्या नोकरभरतीसंदर्भात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या तक्रारी व "सकाळ'ने केलेल्या पाठपुराव्याची दखल सरकारने घेतली. त्यानुसार सहकार खात्याला चौकशीचे आदेश देण्यात आले होते. ही चौकशी पारदर्शकपणे व निःपक्षपणे केली. त्यानंतर आता भरतीप्रक्रिया रद्द करण्याची कार्यवाही कोणत्याही दबावाला बळी न पडता केली. 
- देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री 

नगर जिल्हा बॅंकेच्या भरतीप्रक्रियेबाबत "सकाळ'ने केलेला पाठपुरावा कौतुकास्पद आहे. भरतीप्रक्रियेत काहीतरी गडबड असल्याची आपली खात्री पटल्यानंतर आपण सरकारशी पत्रव्यवहार करून ती रद्द व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. त्याबाबत सरकारने चौकशी करून सकारात्मक कारवाई केली ही समाधानाची बाब आहे. 
- अण्णा हजारे, ज्येष्ठ समाजसेवक 

भरतीप्रक्रियेसंदर्भात "सकाळ'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांमधील तसेच अण्णा हजारे यांनी आम्हाला दिलेल्या पत्रातील मुद्यांच्या अनुषंगानेच चौकशी केली. त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांना सादर केला. त्यानुसार भरतीप्रक्रिया रद्द करण्याची कारवाई विभागीय सहनिबंधकांनी केली. 
- राम कुलकर्णी, चौकशी पथक प्रमुख, नगर जिल्हा बॅंक नोकरभरती प्रकरण 

"सकाळ'ने बॅंकेच्या नोकरभरतीबाबत चांगला पाठपुरावा केला. ही बाब कौतुकास्पद आहे. "सकाळ'ची मालिका व त्याअनुषंगाने अण्णा हजारे यांनी केलेल्या तक्रारी या दोनच बाबींच्या आधारे बॅंकेच्या नोकरभरतीला स्थगिती देण्यात आली. पुढे त्याच अनुषंगाने चौकशीही करण्यात येऊन भरती रद्द करण्यात आली. 
- मिलिंद भालेराव, विभागीय सहकार सहनिबंधक, नाशिक 

Web Title: marathi news Nagar district bank recruitment finally canceled