अहमदनगरच्या उपमहापौरपदी शिवसेनेचे अनिल बोरुडे

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 मार्च 2018

माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

अहमदनगर : शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा भाजपचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम याचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर शिवसेनेचे अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. या निवडणुकीतून भाजप, राष्ट्रवादीने माघार घेतल्याने बोरुडे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली.

छिंदमचा उपमहापौर पदाचा राजीनामा घेतल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर उपमहपौर निवडण्यासाठी सोमवारी (ता. 5) उपमहापौर निवडणूक घेण्यात आली. उपमहापौर पदासाठी राष्ट्रवादीकडून राष्ट्रवादीचे गट नेते समदखान यांनी उपमहापौर पदाचा अर्ज घेतला होता. तर शिवसेनेकडून अनिल बोरुडे, दीपाली बारस्कर, डॉ. सागर बोरुडे या तिघांनी अर्ज घेतले होते. दरम्यान भाजपने या निवडणुकीत माघार घेतली होती. त्यामुळे शिवसेनेने उपमहापौरपद मिळविण्यासाठी ताकद पणाला लावली. सोमवारी निवडणुकीच्या अगोदर राष्ट्रवादीने माघार घेतली. राष्ट्रवादीने उपमहापौर निवडणुकीत घोडेबाजाराला आळा घालण्यासाठी या निवडणुकीत माघार घेतल्याचे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले. तसेच राष्ट्रवादी मतदान प्रक्रियेत सहभाग घेणार नाही, अशीही घोषणा पक्षाच्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

जिल्हाधिकारी अभय महाजन हे 10.45 वाजता महापालिकेच्या सभागृहात दाखल झाले. त्यांनी सभागृहातून पत्रकारांना बाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर उपमहापौर निवडीची प्रक्रिया सुरु झाली. या निवडणुकीतून इतर सर्व इच्छुकांनी माघार घेतल्याने शिवसेनेचे नगरसेवक अनिल बोरुडे यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला.
उपमहापौर निवडणुकीत भाजपचा दिलीप गांधी गट तटस्थ राहीला तर काँग्रेस, राष्ट्रवादी तसेच गांधी गटाचे पाच नगरसेवक सभेला गैरहजर राहिले. भाजपचे बाबा वाकळे, उषा नलावडे, दत्ता कावरे यांनी शिवसेनेला साथ देत मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला.

Web Title: Marathi news nagar news deputy mayor anil borude from shivsena