सरकारी रुग्णालयाला अपवाद आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र

संजय आ. काटे
मंगळवार, 9 जानेवारी 2018

डाॅ. डांगे म्हणाल्या, पुरस्कारासाठी आम्ही काम करीत नव्हतो. सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनापासून यात सेवाभावी वृत्तीने कष्ट घेतले. हे टीमवर्क असून यात आढळगावकरांचा व रुग्णकल्याण समिती सदस्यांचाही मोठा वाटा आहे. केवळ नोकरी म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून सहकाऱ्यांनी काम केल्याने  हा गौरव मिळाला.

श्रीगोंदे (नगर) : सरकारी रुग्णालय म्हटले की अनास्था, अस्वच्छता ही 'टिपीकल इमेज' लोकांच्यात रुजली आहे. तालुक्यातील आढळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र त्याला अपवाद ठरले. नियोजनबध्द पध्दतीने काम केल्याने त्यांनी केंद्र देशात अव्वल ठरवून दाखविले. तेथील महिला वैद्यकिय अधिकारी डाॅ. शैला डांगे यांनी सहकाऱ्यांच्या मदतीने व गावकऱ्यांच्या प्रोत्साहनातून हे अशक्य वाटणारे काम केल्याने त्यांच्या जिद्दीला आज सगळेच सलाम करीत आहेत. 

पंधरा वर्षांपुर्वी तरुणपणात पतीचे छत्र हरपले मात्र मोठ्या जिद्दीने डाॅ. डांगे यांनी ग्रामिण रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची सेवा करताना डोंगराएवढे दु:ख बाजूला ठेवले. कुटूंबाने त्यांना आधार देताना संघर्षाची शक्ती दिली. डाॅ. डांगे यांच्याकडे काही वर्षे तालुका आरोग्य अधिकारी हे प्रभारी पद होते. मात्र आढळगाव येथील कायमस्वरुपी काम सांभाळून त्यांना तेथे न्याय देता येत नव्हता. वरिष्ठांना विनंती करुन त्यांनी आढळगाव येथील एकच पदभार मिळविला. 

आढळगाव येथील रुग्णालयासह तेथील सहा उपकेंद्रातील सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांना विश्वासात घेवून काम सुरु केले. केवळ पगारापुरते काम करु नका, आपल्याला त्या कामातून समाधान मिळेल व येणाऱ्या गोरगरिब रुग्णाच्या डोळ्यातील दु:खाचे अश्रू कसे पुसता येतील यासाठी वेगळे काही तरी करु असा विश्नास त्यांनी सगळ्यांमध्ये तयार केला. 

आपसातील सगळे हेवेदावे दूर करताना त्यांनी आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची एकजूट केली. त्यानंतर अपुऱ्या सुविधांचा विषय बाजूला ठेवत ज्या आहेत त्यात चांगले काम करण्याची सकारात्मक उर्जा त्यांनी सहकाऱ्यांमध्ये जागविली. 

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब मंत्रालयाने आढळगाव केंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन जाहीर केल्याने तीन लाखाचा पुरस्कार मिळणार आहे. तेथील बाह्य व आंतररुग्ण विभाग, रुग्णांना मिळणारी सेवा, सोयी-सुविधा, उपचार, शस्त्रक्रिया विभाग, सरकारी योजनांची अंमलबजावणी आदी बाबींची पाहणी करुन राज्यासह देशात हे केंद्र अव्वल ठरविले. 

डाॅ. डांगे म्हणाल्या, पुरस्कारासाठी आम्ही काम करीत नव्हतो. सहकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मनापासून यात सेवाभावी वृत्तीने कष्ट घेतले. हे टीमवर्क असून यात आढळगावकरांचा व रुग्णकल्याण समिती सदस्यांचाही मोठा वाटा आहे. केवळ नोकरी म्हणून नव्हे तर कर्तव्य म्हणून सहकाऱ्यांनी काम केल्याने  हा गौरव मिळाला.

Web Title: Marathi news Nagar news health