कोपर्डी प्रकरणी आज निकाल 

kopardi
kopardi

नगर : कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून खून केलेल्या खटल्याचा निकाल आज (बुधवारी) जाहीर होणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा न्यायालय व परिसरात सुमारे दोनशे पोलिसांचा बंदोबस्त राहणार आहे. साध्या वेशातील पोलिसही परिस्थितीवर लक्ष ठेवतील. कोपर्डी (ता. कर्जत) येथेही चाळीस पोलिसांसह राज्य राखीव व शीघ्र कृती दलाचे पथक तळ ठोकून असेल. नगर शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी शहरातील सगळ्याच भागांत पोलिसांचा पहारा राहणार आहे. 

राज्यभर गाजलेल्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून झालेल्या खटल्यातील आरोपी जितेंद्र शिंदे, संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे या तिघांनाही विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांनी दोषी ठरवले आहे. खटल्यातील विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी तिघांही फाशीच्या शिक्षेची मागणी केली आहे, तर आरोपीचे वकील ऍड. योहान मकासरे, ऍड. बाळासाहेब खोपडे व ऍड. प्रकाश आहेर यांनी कमीत कमी शिक्षा देण्याची मागणी केलेली आहे. उद्या (बुधवारी) या खटल्यातील आरोपीला शिक्षा सुनावली जाणार आहे. आरोपीला काय शिक्षा सुनावली जाणार याकडे राज्यासह देशाचे लक्ष लागलेले आहे. 

शिक्षा दिली जाणार असल्याच्या या पार्श्‍वभूमीवर पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांनी न्यायालय, नगर शहर व कोपर्डीतही मोठा बंदोबस्त ठेवण्याचे नियोजन केले आहे. न्यायालयाच्या आवारात पोलिस उपअधीक्षकावर बंदोबस्ताची जबाबदारी असेल. न्यायालयाच्या परिसरात चार सहायक पोलिस निरीक्षक, 75 पोलिस कर्मचारी, दहा महिला पोलिस कर्मचारी, प्रत्येकी वीस पोलिस असलेले शीघ्र कृती दलाची दोन पथके व दंगल नियंत्रक पथक, राज्य राखीव दलाचे पथक तैनात असेल. निकालानंतर शहरात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी सहायक पोलिस अधीक्षक अक्षय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जागोजागी "फिक्‍स पॉइंट' लावले आहेत. निकालानंतर वरिष्ठ पोलिस अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून असतील. शहरात एक शीघ्र कृती दलाचे पथक फिरते असेल. न्यायालयाच्या परिसरात वकील, न्यायाधीश, पोलिस आणि नागरिकांच्या वाहनांसाठी न्यायालयासमोर स्वतंत्र वाहनतळाची व्यवस्था केली आहे. त्यासाठी वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांची नेमणूक केली आहे. न्यायालयात येणाऱ्या नागरिकांना सूचना देण्यासाठी ध्वनिवर्धकाची व्यवस्था केली जाणार आहे. नियंत्रण कक्षातही वीस कर्मचारी राखीव असतील. न्यायालय परिसरात निकाल ऐकण्यासाठी मोठी गर्दी होणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर परिसराची बॉंबशोधक पथकाकडून तपासणी केली जाणार आहे. 

कडेकोट बंदोबस्त 
कोपर्डी खटल्यातील आरोपीला शिक्षा सुनावली जाणार असल्याच्या पार्श्‍वभूमीवर शहर, न्यायालय परिसरात कडक बंदोबस्त असेलच; पण ज्या गावात घटना घडली त्या कोपर्डीतही पोलिस उपअधीक्षक, चार पोलिस निरीक्षकांसह 35 पोलिस कर्मचारी तळ ठोकून असतील. याशिवाय शीघ्र कृती दलाची दोन पथके आणि राज्य राखीव दलाचे एक पथक बंदोबस्तासाठी असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com