सातारा नगरपालिकेचे खत लयं भारी! 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

शेतीसाठी उपयुक्त असलेले सेंद्रिय खत पालिकेच्या प्रकल्पातून तयार होते. त्या माध्यमातून रोज अंदाजे दोन टन ओला कचरा रिचवला जातो. भविष्यात शहरात आणखी काही ठिकाणी असे प्रकल्प सुरू करण्यासाठी प्रयत्नशील आहे.  
-यशोधन नारकर, सभापती, आरोग्य समिती, सातारा 

सातारा  - सातारा नगरपालिकेने शहरात पाच ठिकाणी उभारलेल्या सेंद्रिय खतनिर्मिती प्रकल्पांतून नैसर्गिक पद्धतीने खतनिर्मिती होत आहे. त्याचा शेतीसाठी उपयुक्त सेंद्रिय खत म्हणून वापर होतो. शासनाच्या कोल्हापूर येथील फर्टिलायझर कंट्रोल लॅबोरेटरीजने त्यावर मान्यतेची मोहर उमटवली आहे. पालिकेच्या या प्रकल्पातून रोज सुमारे दोन टन ओल्या कचऱ्याचा शास्त्रोक्त पद्धतीने निचरा होत आहे. 

शहरात तयार होणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त प्रक्रिया करणे आवश्‍यक आहे. त्याचा एक प्रकल्प सोनगाव कचरा डेपोवर प्रस्तावित आहे. त्याला नुकतीच मंजुरीही मिळाली असली तरी प्रकल्प पूर्ण होण्यास अवधी लागणार आहे. दरम्यानच्या काळात शहरात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून खत तयार करण्याचे काम पालिकेने प्रायोगिक पातळीवर सुरू केले. या प्रयोगांना आता यश मिळताना दिसू लागले आहे. 

सोनगाव कचरा डेपो, भवानी पेठेतील युनियन भाजी मंडई, सैनिक स्कूल, गुरुवार बाग व पारसनीस कॉलनी या शहराच्या पाच भागात हे प्रकल्प सुरू आहेत. या ठिकाणी ओला कचरा आणून साठवला जातो. त्यात कल्चरचा वापर करून कचरा कुजवून खतनिर्मिती केली जाते. या प्रकल्पात रोज दोन टन ओला कचरा वापरला जातो. कचरा निर्मितीच्या ठिकाणीच प्रक्रिया करण्याच्या या पद्धतीमुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक खर्च वाचण्याबरोबर पालिकेला खत विक्रीतून उत्पन्नही मिळत आहे. 

पालिकेच्या पुढाकाराने झालेल्या प्रकल्पात तयार झालेले खत एक रुपया प्रति किलो या दराने शेतकऱ्यांना विकले जाते. याशिवाय पालिकेच्या विविध उद्यानांमध्येही या खताचा वापर केला जातो, असे पालिकेच्या आरोग्य विभागातून सांगण्यात आले. हे खत शासनाच्या कोल्हापूर येथील फर्टिलायझर कंट्रोल लॅबोरेटरीजमधून तपासून घेतले गेले. या सेंद्रिय खतास महाराष्ट्र स्वच्छ अभियानांतर्गत हरित महासिटी कंपोस्टचे प्रमाणपत्र मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले. 

पालिकेच्या युनियन भाजी मंडईतील प्रकल्प सर्व श्रमिक कचरा वेचक संघटनेमार्फत चालविला जातो. आस्था सामाजिक संस्थेचे संस्थापक विजयकुमार निंबाळकर हे त्यांना मार्गदर्शन करतात. ""गेल्या दीड वर्षांपासून युनियन मंडईतील कचऱ्याचा या प्रकल्पात निचरा केला जातो. कचरा निर्मितीच्या ठिकाणीच त्याचा निचरा करण्याची व्यवस्था व्हावी, अशी त्यामागील मूळ संकल्पना आहे,'' असे श्री. निंबाळकर यांनी सांगितले. 

Web Title: marathi news Organic Manufacturing Project Satara Municipality yashodhan narkar