विद्यार्थी जपणार रानभाजीच्या माहितीचा वारसा

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

पांडे - पर्यावरण सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या धर्मवीर संभाजी विद्यालय (गौंडरे) येथील विद्यार्थी व शिक्षकांनी परिसरातील रानभाज्यांचा अभ्यास करण्याचे ठरविले. रानभाज्यांना आपल्या आहारात अनन्यसाधारण महत्त्व आहे. रानभाजीतून आपल्या शरीराला आवश्‍यक असे विविध घटक मिळतात. बहुतेक रानभाज्यांचा आयुर्वेदिक उपयोगसुद्धा आहे. आपल्या आजी व आजोबांच्या आहारात रानभाजी हा मुख्य घटक होता. आजी व आजोबांपाशी असणाऱ्या या माहितीचा ठेवा जपण्याचा व त्याचे दस्ताविजीकरण करण्याचे विद्यार्थ्यांनी ठरविले.

यामध्ये विद्यार्थ्यांनी घरातील, गावातील आजी व आजोबांशी संवाद साधला. त्यांच्याकडून रानभाज्यांची माहिती घेतली. वेगवेगळ्या आजारांवर उपयोगी असणाऱ्या रानभाज्यांची माहितीही विद्यार्थ्यांनी संकलित केली. रानभाज्या बनविण्याची पाककृतीसुद्धा विद्यार्थ्यांनी नोंद करून घेतली. अशाप्रकारे विद्यार्थ्यांनी त्यांच्या परिसरातील रानभाज्यांची नोंद व अभ्यास करण्यास सुरवात केली आहे.

आपल्या पूर्वाजांकडे असणाऱ्या रानभाजीच्या माहितीचा वारसा विद्यार्थी जपण्याचा प्रयत्न करत आहेत. पर्यावरण सेवा योजनेच्या माध्यमातून दोन पिढ्यांमध्ये माहितीची देवाण-घेवाण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. या संवादामधून विद्यार्थ्यांना नवनवीन माहिती मिळत आहे. विद्यार्थी मिळालेल्या या माहितीतून समृद्ध होत आहेत.

पर्यावरण सेवा योजनेचे विभाग समन्वयक गणेश सातव यांच्या मार्गदर्शनाखाली उपक्रम राबविला जात आहे. योजनाप्रमुख हरिदास काळे व विद्यार्थी माहिती संकलन व दस्ताविजीकरणाचे काम करत आहेत. उपक्रमास विद्यालयाचे मुख्याध्यापक बापू नीळ, इतर सहशिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

रानभाज्यांची लागवड
रानभाज्यांमध्ये काही भाज्या या हंगामी; तर काही वर्षभर येणाऱ्या आहेत. या भाज्यांची ओळख होण्यासाठी योजनाप्रमुख हरिदास काळे व विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात वाफे तयार करून त्यामध्ये रानभाज्यांची लागवड करण्यात आली आहे.

छायाचित्र
गौडरे येथील कर्मवीर संभाजी विद्यालयाचे विद्यार्थी.
PDE18A00737

Web Title: marathi news pande news vegetable student