शिक्षक संघाच्या नेत्यांचे मनोमीलन

संतोष सिरसट  
शुक्रवार, 24 नोव्हेंबर 2017

27 फेब्रुवारीचा बदली आदेश, निवडश्रेणी, जुनी पेन्शन योजना, सातवा वेतन आयोग यासारख्या संघटनांच्या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकण्यासाठी मनोमीलन व्हावे, अशी इतर शिक्षकांची इच्छा आहे. 

सोलापूर - गेल्या दहा वर्षापासून राज्यात प्राथमिक शिक्षक संघाचे दोन गट कार्यरत आहेत. माजी आमदार शिवाजीराव पाटील व शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात या दोघांच्या गटांनी राज्यात आपापले बस्तान बसविले आहे. अशातच दहा वर्षानंतर पुन्हा या दोन्ही शिक्षक नेत्यांनी मनोमीलनाचा निर्णय घेतला आहे. त्यांचा हा निर्णय प्राथमिक शिक्षक असलेल्या त्यांच्या कार्यकर्त्यांना पटणार का? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. 

राज्याच्या ग्रामविकास विभागाने शिक्षकांच्या बदल्यांच्या संदर्भात 27 फेब्रुवारीला एक शासन आदेश काढला आहे. त्या आदेशामुळे एकाच जिल्ह्यातील जवळपास पाच ते सात हजार शिक्षकांच्या बदल्या होणार आहेत. त्यामुळे राज्यातील अनेक शिक्षकांची गैरसोय होणार आहे. त्यासाठी राज्यातील सर्वच शिक्षकांमधून श्री. पाटील व थोरात यांनी एक होणे महत्वाचे असल्याचे त्यांना पटवून सांगण्यात आले होते. 

ओरोस (जि. सिंधुदुर्ग) येथे झालेल्या अधिवेशनात या दोघांमुळेच तालुकाबाह्य प्रशासकीय बदल्यांचा आदेश शासनाने रद्द केला होता. तो उद्देश डोळ्यासमोर ठेवून आताही 27 फेब्रुवारीचा बदली आदेश, निवडश्रेणी, जुनी पेन्शन योजना, सातवा वेतन आयोग यासारख्या संघटनांच्या महत्त्वाच्या प्रश्‍नांवर एकत्र येऊन सरकारवर दबाव टाकण्यासाठी मनोमीलन व्हावे, अशी इतर शिक्षकांची इच्छा आहे. 

2007 मध्ये एकमेकांपासून वेगळ्या झालेल्या श्री. पाटील व श्री. थोरात यांनी एक-दोन महिन्यापूर्वी कोल्हापूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. तो निर्णय त्यांच्या कार्यकर्त्यांच्या पचनी पडणार का? हा खरा प्रश्‍न आहे. प्रत्येक जिल्ह्यात यांचे दोन गट कार्यरत आहेत. दोन्ही नेते एक झाल्यामुळे जिल्हा स्तरावरील नेतेमंडळी एक होणार का? असाही प्रश्न येथे उपस्थित होतो. 

येत्या रविवारी (ता. 26) शिक्षक संघाच्या या नेत्यांनी कोल्हापूर येथे राज्यस्तरीय महामंडळ सभेचे आयोजन केले आहे. त्यात प्रत्येक जिल्ह्यात एकच कार्यकारिणी करण्यावर शिक्कामोर्तब होते का? हे पाहणे औत्सुक्‍याचे ठरेल. 

दोन्ही गट एक झाल्यानंतर राज्याचे अधिवेशन घेऊन राज्य व जिल्हाभर एकच कार्यकारिणी जाहीर करणे अपेक्षित आहे. मात्र, या दोघांनीही राज्यापेक्षा अखिल भारतीय स्तरावरचे अधिवेशन गोव्याला घेण्याचा निर्णय घेतला आहे. यामागे त्यांचा नेमका हेतू काय? याबाबत शिक्षकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू आहेत. अधिवेशनाच्या माध्यमातून पैसे गोळा करण्यासाठी एक होऊ नये, अशी अपेक्षा सर्वसामान्य शिक्षकांची आहे.

 

 

Web Title: marathi news primary teachers have decided to join the meeting