रायगडावरील ऐतिहासिक जीर्ण वास्तुंना येणार जाग; पुरातत्व विभागची कामे सुरु

सुनील पाटकर
रविवार, 25 फेब्रुवारी 2018

रायगडावरील पुरातन वास्तू संरक्षित ठेवण्यासाठी जी कामे होत आहेत ती करताना वास्तुंच्या मूळ ढाच्याला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे. तसेच केमिकल वॅाश या प्रक्रीयेने दगडांच्या भेगा व चिरांमध्ये अडकलेली धूळ आणि शेवाळ स्वच्छ होणार आहे. सिलीकॅान प्रोसेस केल्याने भेगा नष्ट होऊन वास्तुंचे आयुष्यमान वाढणार आहे. 
- अनिल पाटील( सहाय्यक अधिक्षक विज्ञान शाखा)

महाड :  रायगडावरील जीर्ण होत चाललेल्या ऐतिहासिक वास्तुंना आता उर्जितावस्था येणार असुन भारतीय पुरातत्व विभागच्या वतीने रायगडवरील छ.शिवाजी महाराज समाधी आणि जगदिश्वराच्या मंदिराला केमिकल वाँश करण्याच्या कामाला सुरवात करण्यात आली आहे. 

रायगडावर शिवसमाधी, जगदिश्वर मंदिर, या मधील छोटा नगारखाना, बाजारपेठ, शिरकाई मंदिर, राजदरबार बाहेरील मोठा नगारखाना, मेघडंबरी, राण्यांचे महाल, दोन मनोरे, वाघदरवाजा, महादरवाजा इत्यादी पुरातन वास्तु आहेत. या सर्व वास्तुंची काळानुसार पडझड होत आहे. याशिवाय येथे येणाऱ्या पर्यटकांना अनेक गैरसोयी भेडसावत असतात. यासाठी सरकारने रायगडाकडे विशेष लक्ष दिले असुन महाड रायगड रस्त्यांचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर तसेच रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगड संवर्धन व परिसराचा विकासाचा 650 कोटींचा महत्वाकांशी कार्यक्रम आखला आहे. प्रत्यक्षात या कामाला सुरवात झाली नसली तरी पुरातत्व विभागाने आपल्या निधीतून या कामांना सुरवात केली आहे. भारतीय पुरातत्व विभागाच्या विज्ञान शाखा औरंगाबाद च्या वतीने पुरातन वास्तुंच्या केमीकल वॉश या कामाला सुरवात करण्यात आली आहे. या मध्ये वास्तुंवरील शेवाळ काढणे, शेवाळ नव्याने येऊ नये या साठी बाह्य भागावर बायोसाईड कोटींग, वॅाटर रिप्लेंट कोटींग, दगडाच्या मजबुतीसाठी व मुळ ढाच्यासाठी स्पेशल केमिकल ट्रीटमेंट आणि सिलीकॅानचा वापर या पध्दतीचे हे काम जात आहे.

भारतीय पुरातत्व विभागाच्या विज्ञान शाखेचे सहाय्यक अधिक्षक अनिल पाटील रायगडावर आले असता, गडावरील वास्तुंची पडझड त्यांच्या निदर्शनास आली. ही बाब त्यांनी उपधिक्षक श्रीकांत मिश्रा यांच्या लक्षात आणुन दिल्या नंतर त्याच्या मार्गदर्शनाखाली रायगडावरील शिवसमाधी आणि जगदीश्वर मंदिराच्या केमिकल वॉश या कामाला तात्काळ सुरवात करण्यात आली. पहिल्या टप्प्यात या दोन वास्तुंचे काम होणार असुन पुढील टप्प्यात टप्प्या-टप्प्याने  इतर वास्तुचे काम पूर्ण होणार आहे. सदरील काम हे पूर्णपणे पुरातत्व विभाच्या तज्ञांकडून विभागाने उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून होत आहे.

Web Title: marathi news raigad fort news