कृषी राज्यमंत्री सदाभाऊ यांच्या मरळनाथपूरात कृषी साहित्य अनुदानात घोटाळा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 मार्च 2018

कृषी विभागाच्या अनुदानात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण पुराव्यांनिशी समोर आले आहे.

सांगली - कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या गावी मरळनाथपूर (ता. वाळवा) येथी कृषी विभागाच्या अनुदानात लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचे प्रकरण पुराव्यांनिशी समोर आले आहे. वीज कनेक्‍शन नसलेल्या 28 जणांना कृषी पंप, मयत व्यक्तीच्या नावे कृषी साहित्य वाटप आणि जमीन नसताना कृषी योजनांच्या अनुदानाचा लाभ देऊन कृषी अधिकाऱ्यांनीच लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे समोर आले आहे. यामागे सदाभाऊंच्याच बगलबच्च्यांची टोळी असल्याचा आरोप तक्रारदार बळीराजा संघटनेचे संस्थापक बी. जी. पाटील आणि संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष सुयोग औंधकर यांनी केला. 

येथील जिल्हाधिकारी कार्यालयात भ्रष्टाचार निर्मुलन समितीची बैठक झाली. जिल्हाधिकारी विजयकुमार काळम, सचिव त्रिगुण कुलकर्णी यांच्यासमोर त्यांनी सही-शिक्‍क्‍यानिशी पुरावे सादर केले. ते पाहता सकृतदर्शनी घोटाळा झाला असून त्याची सखोल चौकशी करावी, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. शिवाय, या संपूर्ण योजनांच्या सांगली जिल्ह्यात झालेल्या अंमलबजावणीची चौकशी करणे गरजेचे असल्याचे पत्र कृषी आयुक्तांना पाठवण्यात आले आहे. पाटील आणि औंधकर यांनी सप्टेंबर 2017 मध्ये मरळनाथपूर येथील घोटाळ्याविषयी पहिल्यांदा तक्रार केली होती. कृषी विभागाने त्याची दखल घेतली नाही. काही अधिकाऱ्यांचे पथक पाठवून चौकशीचा फार्स केला आणि या प्रकरणात काही घडलेच नाही, असा अहवाल सादर केला. त्यावर संशय व्यक्त करत या संघटनांनी भ्रष्टाचार निर्मुलन समितीकडे तक्रार दाखल केली. त्या समितीची आज बैठक होती. त्यात सदाभाऊंच्या गावातील घोटाळ्याचे पुरावे सादर करू, अशी घोषणा केली होती. त्यानुसार त्यांनी सर्व पुरावे जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर केले. 
अतिशय धक्कादायक घोटाळे समोर येत असल्याचे कबूल करत जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची तत्काळ दखल घेतली. 

मरळनाथपूमधील घोटाळ्यात जे असतील त्यांच्यावर शासन कारवाई करेल, अशी प्रतिक्रिया कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. सदाभाऊ खोत म्हणाले, "प्रकरण माझ्या गावातील आहे म्हणून माझ्यावर आरोप करू नका, फलोत्पादन योजना तर 2014 मधील आघाडी सरकारच्या काळातील आहे. मरळनाथपूरमधील कृषी योजनांमध्ये गैरव्यवहार झाला असेल तर त्याची संपूर्ण चौकशी अधिकारी करतील व शासन कारवाई करेल. माझ्या गावचा म्हणून मी कोणालाही पाठीशी घालणार नाही. मात्र आरोप करणाऱ्यांची पात्रताही तपासली पाहिजे. आरोप करणाऱ्यात काही खंडणीबहाद्दर आहेत. याआधीही तक्रारी झाल्या, चौकशी झाली, त्यात काही निष्पन्न झाले नाहप्रतिक्रियांनीच अधिवेशन काळात असे काही प्रकार करण्यामागे बोलवता धनी वेगळाच आहे.'' 

28 पंपांचा घोटाळा 
मरळनाथपूर येथील 28 शेतकऱ्यांना कृषी पंपांचे वाटप करण्यात आले आहे. या शेतकऱ्यांकडे वीज कनेक्‍शन आहे का, याचा दाखला जोडावा लागतो. वास्तविक, वीज कनेक्‍शन नसताना हे पंप दिले गेले. कनेक्‍शन नाही, याचा पुरावा म्हणून महावितरणकडील कनेक्‍शन धारकांची यादी सादर करण्यात आली. हे प्रकरण सप्टेंबरमध्येच चौकशीला दिले होते, मात्र कृषी अधिकाऱ्यांनी त्याला केराची टोपली दाखवली. शब्दखेळ करत प्रकरण दडपले. ते आता वर आले आहे. तक्रारदारांनी फलोत्पादन योजनेत लाखो रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप केला. त्याचे पुरावे स्वतंत्रपणे सादर करा, त्याची चौकशी केली जाईल, अशी ग्वाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

असा झाला घोटाळा 
रामचंद्र दादू खोत या मयत व्यक्तीच्या नावे दहा हजार रुपयांचे अनुदान लाटण्यात आले आहे. ही व्यक्ती 30 ऑगस्ट 1990 ला मयत झाल्याचा दाखला सादर करण्यात आला. त्या नावे सन 2015-16 ला अनुदान देण्यात आले. संदीप शामराव खोत यांच्या नावे इंचभरही जमिन नाही, तरी त्यांना 1 लाख 33 हजार रुपयांचे कृषी अनुदान देण्यात आले आहे. त्यात गोठा, पलटी, नांगर आदींसाठी अनुदान लाटले आहे. अशाच पद्धतीने सुनील मारुती खोत यांना तब्बल 3 लाख 65 हजार रुपयांचे अनुदान देण्यात आल्याचे पुरावे सादर करण्यात आले. बाळाबाई बापू राऊत या महिलेने मला कोणतेही शेती साहित्य किंवा अनुदान मिळाले नाही, असे शपथपत्र दिले आहे. त्यांच्या नावे अनुदान लाटण्यात आले आहे. तक्रारदारांनी चार पिशव्या भरून आणलेली कागदपत्रे आज जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली. 

Web Title: marathi news sangali sadabhau khot agriculture material grant