सांगली: भीषण अपघातात पाच मल्लांसह सहा ठार

सांगली: भीषण अपघातात पाच मल्लांसह सहा ठार

वांगी : वांगी (ता. कडेगाव) येथे क्रुजर जीप आणि ट्रॅक्‍टर ट्रॉलीची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात पाच मल्ल आणि जीपचालक असे सहाजण जागीच ठार झाले. शुक्रवारी मध्यरात्री साडेअकराच्या सुमारास हा अपघात झाला. हे सारे मल्ल कुंडल (ता. पलूस) येथील क्रांती सहकारी साखर कारखान्याच्या कुस्ती संकुलातील आहेत. 

वांगी गावाशेजारील जुन्या सातारा-सांगली रस्त्यावर चव्हाणमळा-खरकटवाडी येथे हा अपघात झाला. हे सारे मल्ले औंध येथील कुस्ती मैदानासाठी गेले होते. मैदान संपवून कुंडलकडे परत येत असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. मयत सर्व मल्लांनी औंधमधील कुस्ती मैदानात जबरदस्त कामगिरी नोंदवत विरोधी मल्लांना आस्मान दाखवले होते, मात्र परतीच्या प्रवासात काळानेच त्यांच्यावर झडप घातली. या अपघातामुळे सांगलीसह सातारा जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. जीपमधील अन्य आठ मल्लांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर मिरजेतील शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

या भीषण अपघातात विजय शिंदे. (वय-21 रामापूर ता. कडेगाव), आकाश देसाई (वय-23 काले, ता. कराड), शुभम घार्गे (वय-23 सोहोली, ता. कडेगाव), सौरभ माने (वय-20, मालखेड, ता. कराड), अविनाश गायकवाड (वय-21, फुपिरे ता. शिराळा) हे "क्रांती'चे पाच मल्ल आणि जीपचालक रणजीत धनवडे (वय-25 रा. दुधोंडी ता. पलुस) असे सहाजण जागीच ठार झाले. जखमींत अजय कासुर्डे (निगडी ता. कराड), अनिकेत जाधव (किवळ ता. कराड), रितेश चोपडे (साळशिरंबे ता. कराड), अनिल पाटील (काले ता.कराड), प्रतिक निकम (चोराडे ता. खटाव), तुषार निकम (शेणे ता. वाळवा), सुदर्शन जाधव (येणपे ता. कराड) आणि रुषिकेश जाधव (कुंडल ता, पलुस) या मल्लांचा समावेश आहे.

याबाबत अधिक माहिती, कुंडल येथील क्रांती कारखान्याने दहा वर्षांपूर्वी कुस्तीगीरांना लोकाश्रय लाभावा, यासाठी कुस्ती केंद्राची स्थापना केली. तेथे सांगली, सातारा परिसरातून गरीब घरातील होतकरू मुले राहतात. तेथे कुस्तीची तालीम आणि शिक्षण घेतात. त्यातून उभारी घेत असलेल्या मल्लांचे पथक शुक्रवारी औंध (ता. खटाव जि. सातारा) येथे श्री यमाईदेवी यात्रेनिमित्त भरविण्यात आलेल्या कुस्ती मैदानासाठी गेले होते. सायंकाळी कुस्त्या संपल्यानंतर मित्राच्या घरी जेवण करुन रात्री साडेआठला दोन गाड्यातून सर्वजण परतीच्या प्रवासाला निघाले. रात्री पावणेअकरा वाजता वांगी ओलांडून कुंडलच्या दिशेने जात असताना वांगीच्या दक्षिणेला सातारा-सांगली रस्त्यावर चव्हाणमळा येथे हा अपघात झाला. क्रांती कारखान्यावर ऊस टाकून परत येणाऱ्या भरधाव ट्रॅंक्‍टरच्या मागील दोन ट्रॉंल्या हेलकावे खात होत्या. रस्त्याचा अंदाज न आल्याने क्रुजर क्र. (एम.एच.10-ए.एच 7385) चालकाचा गाडीवरचा ताबा सूटून ट्रॅंक्‍टरच्या उजव्या बाजूच्या मोठ्या चाकावर क्रुजर आदळली. 

धडक इतकी जोरदार होती की क्रुजरचे तुकडे झाले. ट्रॅक्‍टरच्या मोठ्या चाकाची रिम वाकली. चाक फूटून मोठा आवाज झाला. त्यानंतर क्रुजर पहिल्या ट्रॉंलीच्या उजव्या फाळक्‍यावर धडकली. टफ तूटून ट्रालीला अडकला. ट्रॉंलीच्या मागच्या दोन्ही चाकामधील अँक्‍सलला क्रुजरने जोराची धडक देऊन जोडलेल्या चाकासह अँक्‍सल बाहेर काढला गेला. त्यामुळे जिपचा एका बाजूचा भाग तटला गेला. या भिषण अपघातात 6 जण जागीच ठार झाले. आठ जण गंभीर जखमी झाले. 

आवाजाने लोक मदतीला धावले 
वाहनांच्या धडकेचा प्रचंड आवाज झाला. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या रहिवाशांनी अपघातस्थळी धाव घेतली. तेथे मदतकार्य तत्काळ सुरु झाले. पाठोपाठ "क्रांती'च्या पैलवानांची दुसरी जिप होती. त्यांनी तत्काळ रुग्णवाहिका आणि पोलिसांना बोलावून घेतले. क्रांती कारखान्यावर माहिती कळवली. अर्ध्या तासाने चिंचणी, कुंडल आणि पलूस येथून अँबुलन्स आल्यावर जखमीना पलूसला हलविण्यात आले. त्यानंतर मृतदेह चिंचणी ग्रामीण रुग्णालयात शवाविच्छेदनासाठी नेण्यात आले. आज सकाळी उपविभागीय पोलिस अधिकारी अमरसिंह निंबाळकर, आमदार मोहनराव कदम यांनी अपघात ठिकाणी भेट देऊन माहिती घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com