अनिकेत कोथळेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 जानेवारी 2018

अनिकेतच्या अस्थी पोलिसांच्या ताब्यात आहेत. काही तपास आणि माहितीसाठी मृतदेह ताब्यात ठेवला होता. अनिकेतच्या कुटुंबीयांनीही केवळ अस्थी नको. मृतदेहच स्वीकारणार, असा पवित्रा घेतला होता. त्यानुसार सीआयडीने आज मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला.

सांगली : शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत मृत्यू झालेल्या अनिकेत कोथळेच्या मृतदेहावर आज (गुरुवार) कुटुंबीयांकडून अंत्यसंस्कार करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते आणि अनिकेतच्या कुटुंबियाच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनिकेतचा मृतदेह आज सकाळी त्याच्या कुटुंबीयांनी ताब्यात घेतला. दोन महिन्यांपूर्वी 6 नोव्हेंबरला रात्री नऊच्या सुमारास शहर पोलिस ठाण्याच्या कोठडीत अनिकेत कोथळेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर ही घटना लपवण्यासाठी बडतर्फ उपनिरीक्षक युवराज कामटे आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अनिकेत आणि त्याचा साथीदार अमोल भंडारे यांनी पलायन केल्याचा बनाव केला. अनिकेतचा मृतदेह आंबोलीच्या जंगलात नेऊन जाळला. एकदा पूर्ण जळाला नाही म्हणून दुसऱ्यांदा जाळला. मात्र तोही अर्धवटच जळाला. हा अर्धवट मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतला होता. अर्धवट जळालेला मृतदेह मिरज वैद्यकीय महाविद्यालयाच्या अॅनॉटॉमी विभागात ठेवण्यात आला होता.

अनिकेतच्या अस्थी पोलिसांच्या ताब्यात आहेत. काही तपास आणि माहितीसाठी मृतदेह ताब्यात ठेवला होता. अनिकेतच्या कुटुंबीयांनीही केवळ अस्थी नको. मृतदेहच स्वीकारणार, असा पवित्रा घेतला होता. त्यानुसार सीआयडीने आज मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात दिला. त्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: Marathi news Sangli news Aniket Kothle cremation