उसाचे क्षेत्र वाढूनही पावसाअभावी उत्पादन घटणार 

उसाचे क्षेत्र वाढूनही पावसाअभावी उत्पादन घटणार 

सांगली : पावसाने दिलेली ओढ, हुमणीच्या प्रादुर्भावामुळे सांगली जिल्ह्यात आठ हजार हेक्‍टरने ऊस क्षेत्र वाढूनही कारखान्यांना यंदाच्या हंगामात उसासाठी झगडावे लागणार आहे. सांगली जिल्ह्यात सर्व हंगामातील उसाचे पीक घेतले जाते. गेल्या वर्षी पावसाळा चांगला झाल्याने शेतकऱ्यांनी ऊस लागवडीला प्राधान्य दिले. कोणत्याही महिन्यात लावण केली तरी ऊसवाढीसाठी पाऊस महत्त्वाचा असतो. जून महिन्यात पाऊस झाला की ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापर्यंत पाण्याचा फारसा ताण जाणवत नाही. महिन्यातून एखादे पाणी देऊन उसाची गरज भागवण्याकडे शेतकऱ्यांचा कल असतो. मात्र, यंदा परिस्थिती बदलली आहे. ऊसपट्टयात पाणी साचून रहावे असा पाऊसच झाला नाही. पाण्याची मोठी कमतरता जाणवते आहे. परिणामी उसाची वाढच खुंटली आहे. गेल्या महिन्यापासून अक्षरश: उन्हाळी हवामान (दिवस-रात्र उकाडा) असल्याने उसाची वाढ आवश्‍यक तेवढी झाली नाही. 

पावसाअभावी एकरी उत्पन्न वाढीचा धोका आहे. शिवाय हुमणीने ऊस पिकांत हुमण्यांनी शेतकऱ्यांना हादरवून सोडले आहे. हलक्‍या जमिनीतील हुमणी कीड मोठ्या प्रमाणावर वाढते आहे. ऊस पिवळा पडू लागला आहे. ऊस हिरवा दिसत असला तरी मुळात पोखरल्याने वाढ खुंटली आहे. हुमणीच्या नियंत्रणासाठी उसाला पाटाने पाणी देण्याची गरज असते. पुरेसे पाणी नसल्याने हा उपायही शेतकरी करूच शकत नाहीत. दमट हवामानामुळे अनेक लोकरी मावाही काही प्रमाणात दिसतो आहे. परिणामी उत्पादन घटण्यावर होणार आहे. 

कागदावर ऊस क्षेत्र जास्त दिसते. प्रत्यक्षात वस्तुस्थिती वेगळी असणार आहे. एकरी 60 टन उत्पादन घेणारे शेतकरी 40 टनांपर्यंत घसरतील. सरासरी 30 ते 35 टक्के घट शक्‍य आहे. याची कारखान्यांनीही धास्ती घेतली आहे. यामुळे उसाचे गाळप नियोजित वेळेपेक्षा लवकर संपणार आहेत. सद्य परिस्थितीचा साखर कारखान्यांकडून आढावा घेतला जातो आहे. 

सांगली जिल्ह्यात 8 हजार हेक्‍टर उसाचे क्षेत्र वाढले आहे. पण सांगली जिल्ह्यात वारणा-कृष्णा काठावरील एक-दोन तालुके वगळता इतर बहुतांशी ऊस पट्टयात दुष्काळ असल्याने उत्पादन निम्म्यापर्यंत घटण्याची शक्‍यता आहे. यामुळे अगदी कमी प्रमाणात उसाची आवक कारखान्याकडे होईल. परिणामी कारखान्यांच्या ऊस क्षेत्रात वाढू असूनही कारखान्यांत स्पर्धा रहाण्याची शक्‍यता आहे. 

सांगली जिल्हा ऊस उपलब्धता हेक्‍टरमध्ये 
आडसाली.............26543 
पूर्व हंगामी.............16385 
सुरू..................... 7868 
खोडवा................ 29380 
एकूण (क्षेत्र).......... 80176

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com