सांगलीत संभाजी भिडेंच्या पोस्टरवर दगडफेक

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

महाराष्ट्र बंदच्या आवाहनानंतर सांगलीतही आज कडकडीत बंद आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी सांगली पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांच्या विविध तुकड्या जिल्हाभर तैनात करण्यात आले आहेत. 

सांगली : दलित संघटनांनी आज मारुती चौकतील शिवप्रतिष्ठानचे संभाजीराव भिडे यांचा गडकोट मोहिमेचा फलक हटवा यासाठी जोरदार निदर्शने केली. त्यावेळी तणाव निर्णाण झाला होता. पोस्टवर दगडफेक करत कार्यकर्त्यांनी ठिय्या मारला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त येथे तैनात होता. 

भीमा कोरेगाव येथील दंगल घडवून आणल्याच्या आरोपावरून भिडे व हिंदू जनजागरण समितीचे मिलिंद एकबोटे यांच्यावर पिंपरी पोलिस ठाण्यात ऍट्रासिटी, दंगल माजवणे या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर आज सांगलीत भिडे यांच्या पोस्टर काढण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्यामुळे सकाळपासून येथे तणाव वाढत आहे. अप्पर पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन केले. त्यावेळी काही कार्यकर्ते गावभागाच्या दिशेने निघाले होते. किरणराज कांबळे, प्रमोद कुदळे, असिफ बावा यांना रोखत शांततेचे आवाहन केले. त्यानंतर साऱ्या कार्यकर्त्यांना जोरदार घोषणाबाजी देत ठिय्या मारला. अखेर महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने फलक काढण्यासाठी बोलविण्यात आले. त्यावेळी दगडफेक करण्यात आली. 

महाराष्ट्र बंदच्या आवाहनानंतर सांगलीतही आज कडकडीत बंद आहे. शहरात अनुचित प्रकार घडू नये, याची खबरदारी सांगली पोलिसांनी घेतली आहे. पोलिसांच्या विविध तुकड्या जिल्हाभर तैनात करण्यात आले आहेत. 

भीमा कोरेगावमधील हिंचाराचानंतर सांगलीतही त्याचे पडसाद काल उमटले. घटनेच्या निषेधार्थ डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून निषेध फेरी काढण्यात आली. त्यानंतर पोलिसांना निवेदन देण्यात आली. रात्री उशीरा विविध दलित संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यात जिल्हा बंद करण्याचे आवाहन करण्यात आले. त्याला आज प्रतिसाद देत, अख्खी सांगली बंद ठेवण्यात आली आहे. शहरातील विश्रामबाग चौक, मारुती चौक, झुलेलाल चौक, स्टेशन चौक, गणपती पेठ परिसरातील दुकाने बंद होती. अत्यावश्‍यक सुविधा सुरु ठेवण्यात आल्या आहेत. येथील गणपती मंदिर परिसरातही दगडफेकीचे प्रकार घडले. त्यामुळे तणावात आणखीच भर पडत आहे. 

अनुचित प्रकर घडू नये, यासाठी शहरात ठिकठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महत्त्वाच्या ठिकाणी जादा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सोशल मीडियावर अफवा पसरवणाऱ्यांवरही पोलिस लक्ष ठेवून आहेत. 

Web Title: Marathi news Sangli news Sambhaji Bhide poster in Sangli