चाचणीपूर्वी निवडीने भाजप इच्छुकांत नाराजी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 22 फेब्रुवारी 2018

सातारा - भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार निश्‍चितीमुळे इच्छुकांमध्ये खळबळ उडाली आहे. जाहीर निवड चाचणीपूर्वीच संघ निवडी केल्याच्या प्रकाराबाबत इच्छुक नाराजी व्यक्त करत आहेत.

सातारा - भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार निश्‍चितीमुळे इच्छुकांमध्ये खळबळ उडाली आहे. जाहीर निवड चाचणीपूर्वीच संघ निवडी केल्याच्या प्रकाराबाबत इच्छुक नाराजी व्यक्त करत आहेत.

सर्वच राजकीय पक्षांना आगामी निवडणुकीचे वेध लागले आहेत. त्यातच राज्यात लोकसभेबरोबरच विधानसभेच्या निवडणुका होण्याच्या शक्‍यता वर्तविल्या जात आहेत. शिवसेनेने वेगळा पवित्रा घेतला तरीही मुदतपूर्व निवडणुकांची शक्‍यता आहे. त्यामुळे राजकीय पक्षांची गोळाबेरीज सुरू झाली आहे. आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. निवडणुकांचा अंदाज घेत पक्षांतर्गत जास्त दावेदार नसलेल्या विविध मतदारसंघातील उमेदवारांची नावे निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले जात आहेत. शिवसेनेने स्वतंत्र लढण्याची केलेली घोषणा व सध्याची परिस्थिती पाहता भाजपनेही स्वबळाचीच तयारी सुरू केली आहे. त्यासाठी वरिष्ठ पातळीवर बैठका सुरू आहेत. नुकत्याच जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर व सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील पाच मतदारसंघांतील संभाव्य उमेदवारांना कामाला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे. 

माण-खटावमधून डॉ. दिलीप येळगावकर, कोरेगावमधून महेश शिंदे, सातारा-जावळीतून दीपक पवार व कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांना कामाला लागण्याचे निर्देश दिले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. याबाबतचे वृत्त ‘सकाळ’ने प्रसिद्ध केले होते. या वृत्तामुळे जिल्ह्यातील भाजपच्या गोटात अस्वस्थता पसरली आहे. त्यात प्रामुख्याने 

या मतदारसंघांतील इच्छुकांचा समावेश आहे. भाजपमधून उमेदवारी मिळण्यासाठी अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. अनेक दिवसांपासून त्यांची निवडणुकीची तयारी सुरू आहे. रंगीत तालीम म्हणून संबंधितांनी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत ताकद लावली होती. त्यातून अंदाज घेऊन कामाचा वेग वाढवला होता. मात्र, अचानकपणे उमेदवारांना कामाला लागण्याच्या सूचना देण्यात आल्याने त्यांच्यात खळबळ उडाली आहे. पाच मतदारसंघांपैकी कोरेगाव, माण व साताऱ्यामध्ये आमदारकीसाठी इच्छुक उमेदवार आहेत. त्यामध्ये सध्या भाजपमध्ये असलेले संतोष जाधव, अनिल देसाई, अमित कदम यांचा समावेश आहे. कऱ्हाड उत्तरमध्ये अन्य पक्षातून मागील वेळी निवडणूक लढवलेले भाजपमध्ये येण्याच्या तयारीत आहेत. निवडणुकीला बराच अवधी असताना असा निर्णय कसा झाला, याचे कोडे संबंधितांना पडले आहे. त्यामुळे काहींनी या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली. जिल्हाध्यक्ष व इतरांवर वरिष्ठांनी नियंत्रण ठेवणे अपेक्षित आहे. तसेच कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांची मतदारसंघातील प्रत्यक्ष ताकद पाहून पक्षाने निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली. तर, काहींनी इच्छुक असल्याचे सांगत पक्ष देईल त्याचे काम केले जाईल, अशी पुष्टीही जोडली. 

वरिष्ठ पदाधिकारी, मंत्र्यांकडून सारवासारव!
दरम्यान, भाजपच्या इच्छुकांनी यासंदर्भात पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरील पदाधिकारी, मंत्र्यांकडे विचारणा करून नाराजी व्यक्त केली. अद्याप असा निर्णय झाला नसल्याचे सांगत वरिष्ठांनी त्यांची समजूत काढल्याचे समजते. मात्र, या एकंदर घटनाक्रमावरून भाजपला उमेदवार निवडताना काळजी घ्यावी लागणार हे नक्की.

Web Title: marathi news satara bjp politics