नवाथे सुटल्याने व्यापाऱ्यांना धास्ती! 

प्रवीण जाधव
मंगळवार, 27 फेब्रुवारी 2018

सातारा - अत्यंत सालस चेहऱ्याचा व मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा सफाईदारपणे बोलणारा ठग विशृत नवाथे सातारा पोलिसांच्या ताब्यातून सटकला. धनादेश किंवा आरटीजीएसद्वारे रक्कम दिल्याचे दाखवत प्रामुख्याने इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू किंवा गाड्यांची खरेदी करून व्यापाऱ्यांना गंडा घालण्याच्या गुन्ह्यात तो पटाईत आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करत सातारा पोलिसांनी पकडलेला नवाथे बाहेर आल्याने व्यापाऱ्यांनी सावध राहणे आवश्‍यक आहे. 

सातारा - अत्यंत सालस चेहऱ्याचा व मराठी, हिंदी व इंग्रजी भाषा सफाईदारपणे बोलणारा ठग विशृत नवाथे सातारा पोलिसांच्या ताब्यातून सटकला. धनादेश किंवा आरटीजीएसद्वारे रक्कम दिल्याचे दाखवत प्रामुख्याने इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू किंवा गाड्यांची खरेदी करून व्यापाऱ्यांना गंडा घालण्याच्या गुन्ह्यात तो पटाईत आहे. प्रयत्नांची पराकाष्ठा करत सातारा पोलिसांनी पकडलेला नवाथे बाहेर आल्याने व्यापाऱ्यांनी सावध राहणे आवश्‍यक आहे. 

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून सातारा, पुणे, सांगली व कोकणातील जिल्ह्यांमध्ये धनादेश व आरटीजीएसने पैसे देण्याचा बहाणा करत व्यापाऱ्यांना गंडा घालण्याचे गुन्हे घडत होते. अत्यंत सफाईदारपणे बोलणारा, चारचाकी गाडीतून येणारा, अत्यंत टापटीप कपडे, आकर्षक मोबाईल वापरणारा हा तरुण गुन्हे करत असल्याची माहिती पोलिसांना मिळत होती. हा कुठला, कोण याची माहिती पोलिसांकडे नव्हती. एकापाठोपाठ एक गुन्हे उघड होत होते. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात तो वावरत होता. मात्र, पोलिसांना सापडत नव्हता. इलेक्‍ट्रॉनिक वस्तू व गाड्यांमध्ये त्याचा जास्त इंटरेस्ट होता. साताऱ्यामध्येही त्याने गौडबंगाल केले होते. फलटण व साताऱ्यातील इलेक्‍ट्रॉनिक वस्तूंच्या विक्रेत्यांना त्याने गंडा घातला. एकाकडून टीव्ही विकत घेऊन दुसऱ्याला कमी किमतीत विकला. घरच्यांना आवडला नाही, दुबईला जायचे आहे, अशी कारणे त्याने सांगितली. त्यानंतर काही महिन्यांनी पुन्हा टीव्ही विकलेल्या दुकानदारालाही गंडा घातला. कोरेगाव, भुईंज व साताऱ्यातील दुचाकी विक्रेत्यांकडूनही केवळ धनादेश देत त्याने वाहने खरेदी केली. बोलण्यात अत्यंत चतुर असल्याने त्याने या दुकानदारांना गंडा घातला होता. 

साताऱ्यात कारवाया वाढल्याने स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पद्‌माकर घनवट व त्यांच्या पथकाने नवाथेचा शोध सुरू केला. त्यामध्ये विशृतचे नाव पुढे आले. घरी आई-वडील. परंतु, ते त्याच्याशी संबंध तोडल्याचे सांगायचे. तो सतत मोबाईल बदलायचा. लोकशनही ट्रेस होऊ देत नव्हता. त्यामुळे त्याचा माग काढायचा कसा, असा प्रश्‍न पोलिसांना पडलेला होता. पोलिसांनी अत्यंत चिकाटीने सहा महिने प्रयत्नांची पराकाष्ठा केली. तेव्हा विशृतला पकडण्यात यश आले. त्या वेळी त्याचे अनेक कारनामे उघडकीस आले. विविध जिल्ह्यांत त्याच्यावर फसवणुकीचे आठ गुन्हे दाखल आहेत. सनक आली की गुन्हा करायचा, त्यासाठी कोणतीही पद्धत अवलंबायची, अशी त्याची पद्धत होती. व्यापाऱ्यांना गंडा घालणारा नवाथे सातारा पोलिसांच्या ताब्यातून निसटला आहे. त्याच्याकडून आणखी गुन्हे होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी या ठगापासून सावध राहणे आवश्‍यक आहे. त्याच्याबाबत काही माहिती मिळाल्यास तातडीने संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. 

"आरटीजीएस' मेसेजचा सफाईदार वापर 
मोबाईल वापरण्यातही विशृत नवाथे तयार आहे. धनादेशावर व्यापारी वस्तू द्यायला तयार होईना म्हटल्यावर आरटीजीएसने पैसे द्यायची तयारी दाखवत होता. स्वत:कडील मोबाईलवरून तो आरटीजीएस केल्याचा मेसेज स्वत:च्या मोबाईलवर व आरटीजीएसची रक्कम मिळाल्याचा मेसेज दुकानदाराच्या मोबाईलवर पाठवायचा. हुबेहूब मेसेज असल्याने दुकानदारही त्याला वस्तू ताब्यात देत होते. अशा पद्धतीने त्याने अनेक व्यापाऱ्यांना गंडा घातला आहे.

Web Title: marathi news satara crime