सातारा पालिका इमारतीत पेंटरचा निर्घृण खून 

प्रविण जाधव
रविवार, 11 मार्च 2018

राजेंद्र सूर्यवंशी या रंगकाम करणाऱ्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून खून करण्यात आला. 

सातारा - नगरपालिका इमारतीच्या तळमजल्यावर झोपलेल्या एका रंगकाम करणाऱ्याचा आज पहाटे डोक्‍यात दगड घालून खून करण्यात आला आहे. राजेंद्र बबन सूर्यवंशी (वय 40, रा. घोरपडे कॉलनी, केसकरपेठ) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. राजेंद्र हे पेंटरचे काम करत होते. पाच-सहा वर्षांपूर्वीपासून त्यांची पत्नी मुलांसह माहेरी राहते. तेव्हापासून ते पालिकेच्या इमारतीखाली बांधलेल्या गाळ्यांत झोपायला जात होते. काल रात्री ते नेहमीप्रमाणे झोपायला गेले होते.

आज सकाळी पालिकेचे कर्मचारी आले, तेव्हा त्यांना राजेंद्र रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसले. त्यांनी याबाबत तातडीने माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर शहर पोलिस ठाणे तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी व कर्मचारी तातडीने पालिकेत आले. घटनास्थळी श्‍वानपथकही बोलावण्यात आले होते. श्‍वानाने मृतदेहापासून रस्त्यापर्यंत माग काढला. त्यानंतर ते तेथेच घुटमळत राहिले. राजेंद्रसोबत सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागात झाडलोट करणारा राजा नावाची (पूर्ण नाव नाही) व्यक्तीही झोपायला असते, अशी माहिती पोलिसांना मिळाली आहे. राजेंद्रवर दगडाने घाव घातला असल्याचे प्राथमिक पाहणीत समोर आले आहे. त्याच्या नातेवाईकांना घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात नेला.

शवविच्छेदन झाल्यानंतर तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. राजेंद्र यांचा खून कशामुळे झाला, याचे कारण समजू शकले नाही. उपअधीक्षक डॉ. खंडेराव धरणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक पद्माकर घनवट, सहायक निरीक्षक प्रसन्न जऱ्हाड, शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण सारंगकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. 

Web Title: marathi news satara crime murder painter police