फडणवीससाहेबांचा महिना 283 दिवसांचा? 

फडणवीससाहेबांचा महिना 283 दिवसांचा? 

सातारा - 18 मे 2017 चा तो दिवस... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससाहेब साताऱ्यात आले... अन्‌ घोषणा केली. साताऱ्याचे मेडिकल कॉलेजवर महिनाभरात अंतिम निर्णय घेणार... या ग्वाहीला तब्बल नऊ महिने उलटले. त्यामुळे सातारकरांना प्रश्‍न पडला आहे की, फडणवीससाहेबांचा महिना 283 दिवसांचा आहे की काय? सातारा शहराची हद्दवाढही "रद्दी'त अडकली, प्रकल्पांची कामे धिम्या गतीने, पुनर्वसनाचे घोडे गंगेत न्हाऊन निघत नाही, कऱ्हाडचे विमानतळ भूसंपादनात रुतलेले. आज पुन्हा मुख्यमंत्री साताऱ्यात येत आहेत. त्यानिमित्ताने त्यांनी मागे केलेल्या घोषणेचे स्मरण सातारकरांकडून केले जात आहे... 

मेडिकल कॉलेजसाठी जागा देताना शासनाने अक्षरश: "ख्योळ' सुरू ठेवला आहे. सात वर्षे लोटली तरी सातारकरांच्या आरोग्यासाठी माइलस्टोन ठरू पाहणाऱ्या या कॉलेजला जागा देण्याचा निर्णय होऊ शकत नाही, हा म्हणजे साताकरांच्या भावनांशी खेळण्याचा प्रकार आहे. मेडिकल कॉलेजसाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाची जागा वैद्यकीय खात्याला वर्ग करायची आहे. दोन्ही खाती गिरीश महाजन यांच्याकडे आहेत. "मॅग्नेटिक महाराष्ट्रा'चा निर्णय घेताना तुम्ही 40 वर्षांची दूरदृष्टी ठेवली, तर मग सातारा जिल्ह्यात येऊन घोषणा करताना मुख्यमंत्र्यांची दृष्टी कोणती होती, असा सवाल सातारकरांच्या मनात उभा ठाकला आहे. 

40 वर्षांपासून रखडली हद्दवाढ 

सातारा पालिकेची हद्दवाढ तर 1977 पासून प्रस्तावित आहे. तब्बल 40 वर्षे उलटली, तरी हद्दवाढ होत नाही. तर मग साताऱ्याचा विकास कसा होणार? एकीकडून खासदार, तर दुसरीकडे आमदार पाठपुरावा करत आहेत, तरीही प्रशासनाचे घोंगडे अडलेले आहेच. गत मार्चमध्ये हद्दवाढीची अधिसूचना काढण्यात आली. विशेष म्हणजे चौथ्यांदा अधिसूचना काढूनही ठोस निर्णय नाहीच. नगरविकास खाते तुमच्याकडेच आहे, त्यामुळे सातारकरांच्या भावनेचे राजकारण न करता मुख्यमंत्रीसाहेब हद्दवाढ करा, अशी विनवणी सातारकर करत आहेत. 

प्रकल्प, पुनर्वसन अपूर्णच 

सातारा जिल्हा म्हणजे धरण, मध्यम, लघुप्रकल्पांचा जिल्हा आहे. कोयना धरण बांधून त्याला 50 वर्षे झाली, तरीही प्रकल्पग्रस्तांच्या तीन तीन पिढ्या पुनर्वसनासाठी प्रशासनाच्या पायऱ्या झिजवत आहेत. विविध प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन करण्यासाठी खास बाब म्हणून मान्यता दिली जाते. मात्र, जिल्ह्याच्या ठिकाणी खास बाब धूळ खात पडत असते. उरमोडी, जिहे-कठापूर, वांग-मराठवाडी आदी प्रकल्प विशिष्ट कालावधीत पूर्ण होतील, असे आश्‍वासन दिले होते. मात्र, तो कालावधी किती असेल, या प्रश्‍नाला वर्ष झाले तरी उत्तर मिळालेले नाही. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com