आमच्या नव्या घरात पाणी कवा येणार?

शैलेन्द्र पाटील
गुरुवार, 15 मार्च 2018

प्राधिकरणाचे हात वर! 
सदरबझारमधील रहिवाशांना पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी प्राधिकरणाची आहे. आमची सदरबझारमध्ये कोणतीही  पाणीवितरण यंत्रणा पूर्वीपासून अस्तित्वात नाही. मग पाणी कसे द्यायचे, असे पालिका  व पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. ‘शुक्रवार पेठेतील कोटेश्‍वर टाकीला पुरविण्यात येणारा भार पालिकेने कमी करावा. त्यानंतर हे वाचलेले पाणी आम्ही आंबेडकरनगराला देऊ,’ असे प्राधिकरणाचे म्हणणे आहे. या दोघांच्या वादात आंबेडकरनगर झोपडपट्टीतील लोक आज ना उद्या पाणी मिळणार या आशेवर आहेत!

सातारा - स्वप्नवत वाटणारी योजना मजल- दरमजल करत अखेर साकार झाली. त्यांना हक्काची घरकुलं मिळाली. दीड महिना उलटून गेला; परंतु त्यांच्या नव्या घरांमधील नळांना अद्याप पाण्याचा ठिपूस नाही. पाण्याविना या कुटुंबांची आबाळ संपलेली नाही! पत्रकार दिसला तर कोणी अधिकारीच पाहणी करायला आल्याच्या कल्पनेने ते ‘आमच्या नव्या घरांतील नळांना पाणी कवा येणार ? सायेब तेवढं पाडव्यापर्यंत तरी पाणी द्या अन्‌ आमचा सण गोड करा’ अशी विनवणी तेथील बायाबापडे करतात. लहान मुलं अत्यंत निरागस चेहऱ्यांनी अनोळखी माणसं न्याहाळत असतात; जणू ‘सायब पाणी देताय नव्हं’ असाच प्रश्‍न ते विचारतात!

केंद्र शासनाच्या एकात्मिक गृहनिर्माण व झोपडपट्टी सुधारणा योजनेअंतर्गत सदरबझारमध्ये आंबेडकरनगर झोपडपट्टीसमोरील जागेत ३३२ घरकुले बांधून पूर्ण आहेत. फेब्रुवारीत या घरकुलांचे ड्रॉद्वारे वाटपही झाले. मात्र, या रहिवाशांपुढे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न आ वासून उभा आहे. स्वप्नवत वाटणाऱ्या घरकुलांचा त्यांनी ताबा घेतला खरा; पण त्यांच्या मागील शुक्‍लकाष्ट काही संपलेले नाही. 

सदरबझार भागात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण पाणीपुरवठा करते. या निवासी संकुलामध्ये मंजूर आराखड्यानुसार इमारतीच्या छतावर पाण्याच्या साठवण टाक्‍या बांधल्या आहेत. योजना पूर्णत्वास गेल्यानंतर पाणी कनेक्‍शनचा विषय समोर आला तेव्हा प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी एवढ्या उंचीवर पाणी चढणार नाही, असे सांगून पाणी देण्याबाबत हात वर केले.

त्यामुळे पालिकेने गेल्या वर्षी वाढीव काम काढून अडीच लाख लिटर क्षमतेची बैठी टाकी बांधली. प्राधिकरणाचे पाणी या टाकीत घेतले जाईल.  नंतर ते पंपाने वर चढवून घरकुलांना गरजेनुसार देण्याचे नियोजन आहे. आता ही बैठी टाकी बांधून चार महिने उलटून गेले. लोक राहायला जाऊन दीड महिन्याचा कालावधी लोटला, अजून या रहिवाशांना घरकुलांत पाणी मिळालेले नाही. संकुलाच्या परिसरात कोणी ही अनोळखी दिसलं तरी अधिकारीच पाहणी करायला आल्याच्या कल्पनेने रहिवाशी मागेमागे करतात. त्यांचे म्हणणे  एकच असते ‘तेवढं पाडव्यापर्यंत तरी पाणी द्या अन्‌ आमचा सण गोड करा ! ’

Web Title: marathi news satara news