साताऱ्यातील महाराष्ट्र स्कूटर्स पुन्हा सुरु करा : आमदार शिवेंद्रसिंहराजे

सिद्धार्थ लाटकर
शुक्रवार, 2 मार्च 2018

महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्रकल्प बंद असल्याने या कंपनीवर अवलंबून असणारे अनेक लहान उद्योग सध्या बंद आहेत. त्यामुळे बेरोजगारीची समस्या जटिल बनली आहे. हे लहान उद्योग सुरु झाल्यास साताऱ्यातील औद्योगिकरणास चालना मिळणार असून, बेरोजगारी नष्ट होण्याबरोबरच संबंधित उद्योगाशी निगडित कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटणार आहे.

सातारा : सातारा औद्योगिक वसाहतीतील महाराष्ट्र स्कूटर्स ही एक जुनी आणि महत्वाची कंपनी आहे. मात्र, या कंपनीचे कामकाज सध्या बंद आहे. सदर कंपनीबाबत सरकार आणि बजाज यांच्यात लवादाकडे अनेक वर्षे खटला सुरु आहे. खटल्याबाबत उच्च न्यायालयाने दिलेला निकाल बजाज यांना मान्य आहे. मात्र, राज्य सरकार या निकालाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात गेल्याचे समजते. साताऱ्यातील उदयोजकता आणि रोजगारनिर्मितीची निकड पाहता महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी तातडीने सुरु होणे आवश्‍यक आहे. त्यामुळे याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन सदर कंपनी त्वरित सुरु करावी, अशी आग्रही मागणी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे गुरुवारी (ता. 1) केली. 

महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्रकल्प बंद असल्याने या कंपनीवर अवलंबून असणारे अनेक लहान उद्योग सध्या बंद आहेत. त्यामुळे बेरोजगारीची समस्या जटिल बनली आहे. हे लहान उद्योग सुरु झाल्यास साताऱ्यातील औद्योगिकरणास चालना मिळणार असून, बेरोजगारी नष्ट होण्याबरोबरच संबंधित उद्योगाशी निगडित कुटुंबांचा उदरनिर्वाहाचा प्रश्‍न सुटणार आहे. महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी पुन्हा सुरु झाल्यास येथील सुशिक्षित आणि गरजू बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीच्या विरोधातील सर्वोच्च न्यायालयाकडील अपील माघारी घ्यावे. याबाबत बजाज यांच्याशी चर्चा व वाटाघाटी करुन शासन स्तरावर महाराष्ट्र स्कूटर्स कंपनीचा प्रकल्प त्वरीत सुरु व्हावा, याबाबत राज्य सरकारने ठोस निर्णय घेणेबाबत आपण दोघांनी स्वत: लक्ष घालावे आणि औद्योगिकरण आणि बेरोजगारीशी निगडीत प्रश्‍न तातडीने मार्गी लावावा, अशी मागणी निवेदनात नमूद करण्यात आली आहे. 

याबाबत दोन्ही नेत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून महाराष्ट्र स्कूटर्स कंपनी पुन्हा सुरु होण्यासाठी आपण योग्य ते सहकार्य करु, असे आश्‍वासनही भोसले यांना दिले. यावेळी चेअरमन राजेश कोरपे, धैर्यशील भोसले, राजेंद्र रानडे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Web Title: Marathi News Satara News Again Start Maharashtra Motors Says MLA Shivendra Singh Raje