भरधाव टेंपोच्या धडकेत महाविद्यालयीन युवती ठार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

सातारा - लिंब (ता. सातारा) हद्दीत आज दुपारी भरधाव टेंपोने दोन दुचाकींना धडक दिली. त्यात मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून साताऱ्याकडे येत असलेली अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या युवतीचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. त्यातील एका युवतीची प्रकृती चिंताजनक आहे.

सातारा - लिंब (ता. सातारा) हद्दीत आज दुपारी भरधाव टेंपोने दोन दुचाकींना धडक दिली. त्यात मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करून साताऱ्याकडे येत असलेली अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या युवतीचा मृत्यू झाला, तर अन्य तिघे जखमी झाले आहेत. त्यातील एका युवतीची प्रकृती चिंताजनक आहे.

स्मिता दीपक अडसूळ (वय 21, रा. ललगुण, ता. खटाव) असे मृत युवतीचे, तर तेजल जयवंत पाटील (वय 21, रा. सदरबझार, सातारा), प्रशांत राज जाधव (वय 21, रा. उपळवे, ता. फलटण), किरण कदम (रा. सातारा) अशी जखमींची नावे आहेत. जखमी तेलजचा वाढदिवस साजारा करून सर्व जण साताऱ्याकडे येत होते. सर्व जखमी हे अभियांत्रीकी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. स्मिताही याच महाविद्यालयात शिकत होती. तेजल पाटील हिचा आज वाढदिवस होता. तो साजरा करण्यासाठी चौघे जण दोन दुचाकींवरून लिंब परिसरातील बारामोटीच्या विहिरीकडे गेले होते. वाढदिवस साजरा केल्यानंतर ते साताऱ्याकडे परत येत होते. चौघेही लिंब गावच्या हद्दीतील प्रतापसिंह हायस्कूलसमोर आले. त्या वेळी साताऱ्याहून लिंबच्या दिशेने निघालेल्या टेंपोने दोन्ही दुचाकींना जोराची धडक दिली. वाहनाच्या जोरदार धडकेमुळे चौघेही गाडीवरून उडून बाजूला पडले. त्यामध्ये स्मिताच्या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली. अन्य तिघेही जखमी झाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना तातडीने उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच स्मिताचा मृत्यू झाला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. अन्य जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यापैकी तेजलची स्थिती गंभीर असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे प्राथमिक उपचारानंतर तिला तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दरम्यान, या अपघाताची माहिती वेगाने महाविद्यालयात समजली. त्यानंतर संबंधित महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या आवारात गर्दी केली होती. अपघाताची नोंद सातारा तालुका पोलिस ठाण्यात झाली आहे.

Web Title: marathi news satara news college girl death in accident