कऱ्हाडचे उपजिल्हा रुग्णालय रुग्णसेवेचे मॉडेल

हेमंत पवार
गुरुवार, 15 मार्च 2018

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाने सलग तीन वेळा आनंदीबाई जोशी पुरस्कार पटकावून ‘हॅटट्रिक’ केली आहे. चांगल्या ‘टीमवर्क’ची ती पोचपावती असून, त्यात रुग्णालयातील सर्वांचाच वाटा आहे. यापुढेही रुग्णालयाचा दर्जा टिकवून चांगल्या सोईसुविधा देण्यासाठी प्रयत्न केले जातील.
- डॉ. प्रकाश शिंदे, वैद्यकीय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय, कऱ्हाड

कऱ्हाड - येथील सौ. वेणुताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालयाने सलग तीन वर्षे आनंदीबाई जोशी पुरस्कार पटकावून विक्रम केला आहे. रुग्णांना देण्यात येणाऱ्या सोयी - सुविधांसह उपचार आणि अन्य बाबींचा विचार करून हा पुरस्कार सलग तीन वेळा पटकावणारे येथील उपजिल्हा रुग्णालय हे राज्यातील पहिले उपजिल्हा रुग्णालय ठरले आहे. त्यातून कऱ्हाडचे उपजिल्हा रुग्णालय हे रुग्णसेवेचे मॉडेल म्हणून नावारूपास आले असून, त्यामुळे रुग्णालयाच्या शिरपेचात मानाचा तुराच रोवला गेला आहे. 

रुग्णांच्या सेवेसाठी येथे पहिल्यांदा शासकीय सेवा म्हणून कॉटेज हॉस्पिटल सुरू झाले. त्याद्वारे रुग्णांना शासकीय आरोग्य सेवा मिळू लागली. त्यानंतर विस्तारवाढ झाल्यामुळे कॉटेज हॉस्पिटलला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा मिळाला. त्याचे वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय असे नामकरण करण्यात आले. त्याद्वारे कऱ्हाड, पाटण, वाळवा, कडेगाव आदी तालुक्‍यांतील रुग्णांना संबंधित रुग्णालयातर्फे सेवा दिली जाते. मध्यंतरी आमदार पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्रिपदी असताना रुग्णालयाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाल्यामुळे रुग्णालयात आवश्‍यक त्या सोयीसुविधा करण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णांची चांगली सोय झाली आहे. त्यामुळे रुग्णांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वर्षात एक लाख १८ हजार ६९ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे, तर तीन हजार ५५९ महिलांची प्रसूती उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आल्या आहेत.

दिवसेंदिवस दररोज उपचार आणि तपासणीसाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येतही मोठी वाढ झाली आहे. माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी करणे, प्रजनन व बाल आरोग्याची सेवा प्रभावीपणे देणे, कुटुंब कल्याण उपक्रमांची यशस्वीपणे अमंलबजावणी करणे आणि लोकसहभागातून आरोग्य कार्यक्रम यशस्वी करणे या निकषांवर राज्याच्या आरोग्य विभागामार्फत येथील उपजिल्हा रुग्णालयाचे मूल्यांकन झाले. त्यात तीन वर्षांपूर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयाला आनंदीबाई जोशी पुरस्कार जाहीर केला. 

उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रकाश शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला होता. केवळ पुरस्कारापुरतेच काम न करता पुरस्कारासाठी आलेल्या पथकाच्या माहितीसाठी आरोग्य सेवा न राहता रुग्णांना कायमस्वरूपी सेवा मिळावी, यासाठी डॉ. शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी सातत्याने प्रयत्न केला. काही विभागांचे तज्ज्ञ डॉक्‍टर नसताना आणि कर्मचारी संख्या कमी असूनही उपजिल्हा रुग्णालयाने आहे, त्या मनुष्यबळात रुग्णांना चांगली सेवा आणि सुविधा देऊन शासनाच्या आरोग्य विभागाच्या योजना सामान्यांपर्यंत पोचवण्याचे मोठे काम केले आहे. त्याचबरोबर रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचेही प्रमाणही वाढल्याचे रुग्णालयातून सांगण्यात आले.

Web Title: marathi news satara news district hospital patient service model