जिल्हा नियोजन समिती खर्च करण्यात सुसाट!

उमेश बांबरे
गुरुवार, 15 मार्च 2018

सातारा - जिल्हा नियोजन समितीचा २०१७-१८ साठी जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेल्या निधीतून आतापर्यंत २१३ कोटी ८६ लाख रुपये खर्च झाले आहेत. एकूण निधीच्या ९० टक्के निधी खर्च झाला असून, उर्वरित निधी मार्चअखेरपर्यंत खर्च करण्याचे आव्हान नियोजन समितीपुढे आहे. त्यासाठी मार्चअखेरची धांदल सुरू झाली आहे. 

सातारा - जिल्हा नियोजन समितीचा २०१७-१८ साठी जिल्हा वार्षिक योजनेतून मिळालेल्या निधीतून आतापर्यंत २१३ कोटी ८६ लाख रुपये खर्च झाले आहेत. एकूण निधीच्या ९० टक्के निधी खर्च झाला असून, उर्वरित निधी मार्चअखेरपर्यंत खर्च करण्याचे आव्हान नियोजन समितीपुढे आहे. त्यासाठी मार्चअखेरची धांदल सुरू झाली आहे. 

जिल्हा नियोजन समितीची २०१७-१८ साठीची वार्षिक योजनेत सर्वसाधारणसाठी २४३.६५ कोटी रुपये उपलब्ध झाले होते. त्यापैकी २१३ कोटी ८६ लाख रुपये खर्च झाले आहेत. डोंगरी विकास कार्यक्रमात सात कोटी सहा लाख रुपये उपलब्ध झाले होते. त्यातून अंगणवाडी व इतर कामांसाठी सहा कोटी ९७ लाख रुपये खर्च झाले आहेत. आमदार निधीतून जिल्ह्याला २४ कोटी रुपये उपलब्ध झाले होते. त्यातून १८ कोटी नऊ लाख रुपये खर्च झाले आहेत.

आमदार निधीतील सहा कोटी अद्याप शिल्लक असून, ते मार्चअखेरपर्यंत खर्च करावे लागणार आहेत.

पंधराव्या व सोळाव्या लोकसभेतून खासदार उदयनराजे भोसले यांच्या फंडातून ३० कोटी रुपये उपलब्ध झाले होते. त्यापैकी २८ कोटी ७२ लाख रुपये खर्च झाले आहेत. खासदारांचा निधी हा पुढील वर्षात वापरता येतो. त्यामुळे तो परत जात नाही. 

‘नियोजन’चा कपात केलेला ५८ कोटींचा निधीही फेब्रुवारीअखेरीस उपलब्ध झाला असून, त्यातून जिल्हा परिषद व इतर विभागांना निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे येत्या मार्चअखेर सर्वसाधारण विभागाचा ३१ कोटी, आमदार फंडातील चार कोटी आणि डोंगरीचा ६३ लाख असा एकूण ३५ कोटी ६३ लाख रुपयांचा निधी खर्च करावा लागणार आहे.

प्रादेशिक पर्यटन योजनेतून ५.९७ कोटी निधी
प्रादेशिक पर्यटन योजनेतून जिल्ह्यातील विविध कामांसाठी ५.९७ कोटींचा निधी उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये अजिंक्‍यतारा किल्ला प्रवेश कमान ते किल्ला या रस्त्यासाठी एक कोटी ४६ लाख ५३ हजार मंजूर असून, त्यापैकी २० लाख उपलब्ध आहेत. बरड (ता. फलटण) येथील शिवमंदिर व हनुमान मंदिरासाठी ३७ लाख रुपये मंजूर असून, शिवमंदिरासाठी दहा, तर हनुमान मंदिरासाठी दहा लाख उपलब्ध झाले आहेत. चवणेश्‍वर परिसर विकासासाठी एक कोटी ३३ लाख ६९ हजार रुपये मंजूर असून, त्यापैकी १५ लाख उपलब्ध आहेत. वाई पालिका महागणपतीजवळील पुलासाठी एक कोटी ९२ लाख मंजूर असून, त्यापैकी २५ लाख उपलब्ध झाले आहेत. विरकरवाडी म्हसवड पालिकेला २० लाख मंजूर असून, त्यापैकी दहा लाख उपलब्ध आहेत, तर पाचगणी पालिकेला ई टॉयलेटस्‌साठी ९१ लाख रुपये उपलब्ध झाले आहेत. 

Web Title: marathi news satara news district management committee expenditure