‘फॅन्सी’ क्रमांकाची वाढतेय ‘क्रेझ’

प्रवीण जाधव
बुधवार, 14 मार्च 2018

सातारा - अकरा महिन्यांत आकर्षक क्रमांकाच्या शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यावरून जिल्ह्यात आकर्षक क्रमांकाची क्रेझ वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

सातारा - अकरा महिन्यांत आकर्षक क्रमांकाच्या शुल्कातून उपप्रादेशिक परिवहन विभागाला तब्बल तीन कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यावरून जिल्ह्यात आकर्षक क्रमांकाची क्रेझ वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे.

गेल्या काही वर्षांपासून आकर्षक क्रमांक घेण्याची क्रेझ वाढत आहे. त्यामध्ये युवकांबरोबर प्रौढांचाही जास्त सहभाग आहे. त्यामुळे दर वर्षी आकर्षक क्रमांकापासून मिळणाऱ्या उत्पन्नात वाढ होत आहे. गेल्या ११ महिन्यांत सातारा उपप्रादेशिक परिवहन विभागाला आकर्षक क्रमांकाच्या शुल्कापासून तीन कोटी २४ लाख ४७ हजार ५०० रुपये महसूल मिळाला आहे. त्यात पाच हजार रुपयापर्यंतच्या क्रमांकातून सर्वाधिक एक कोटी ३६ लाख, साडेसात ते दहा हजार रुपयांपर्यंतच्या शुल्कातून ४३ लाख ८० हजार, दहा ते वीस हजारांच्या दरम्यानच्या क्रमांकातून ३१ लाख ७० हजार, वीस हजार ते ५० हजार रुपयांपर्यंतच्या क्रमांकातून ७३ लाख सात हजार ५०० रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ५० हजार ते एक लाख रुपयापर्यंतच्या शुल्क सहा वाहनधारकांनी भरले आहे. त्यातून चार लाख २० हजार रुपये, तर एक लाख ते अडीच लाख रुपयांपर्यंतची रक्कम १६ वाहनधारकांनी एका नंबरसाठी मोजली आहे. त्यातून २५ लाख ८० हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. ११ महिन्यांत चार हजार ५४४ जणांनी आकर्षक क्रमांकासाठी शुल्क भरण्याची तयारी दर्शविली आहे.

नवीन सिरीज खुली
दुचाकी वाहनांच्या संख्या वेगाने वाढत आहे. त्याचबरोबर आकर्षक क्रमांकासाठी पसंतीही वाढत आहे. त्यामुळे नवीन सिरीज खुल्या होत आहेत. आज दुचाकी वाहनांसाठी आकर्षक वाहन क्रमांकाची एमएच ११ सीएन ही नवी मालिका उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात सुरू होत आहे. या वेळी नवीन वाहन मालिका संगणकीय वाहन चार या प्रणालीवर सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात संपर्क साधावा, तसेच येताना पत्त्याच्या पुराव्याची साक्षांकित प्रत, आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा निवडणूक ओळखपत्र यापैकी एक ओळखपत्राची प्रत, तसेच ई- मेल आयडी, मोबाईल क्रमांक व पिन कोड क्रमांक अर्जासोबत देणे बंधनकारक असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी सांगितले.

Web Title: marathi news satara news fancy number plate rto revenue