कुशीत आग लागून अडीच लाखांचे नुकसान, जीवितहानी टळली

burn
burn

तारळे : कुशी गावठाण तालुका पाटण येथे घरा लगतच्या क्षेत्रातील पेटवलेल्या उसाच्या पाचटीतून वाऱ्याच्या झोताने आग पसरून त्यालगत असणारे जगन्नाथ लक्ष्मण खामकर यांच्या पत्राशेडपर्यंत पोहोचली. तेथे असलेल्या गवताच्या गंजीमुळे आग भडकली. यात सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने घरात झोपलेली दोन लहान मुले प्रसंगावधान राखून बाहेर काढल्याने जीवितहानी टळली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, की जगन्नाथ लक्ष्‍मण खामकर (वय. 60, राहनार आवर्डे, तालुका पाटण) यांचे कुशी गावठाणात जनावरांसाठी बांधलेली दोन पत्रा शेड व त्यालगत घर आहे. या शेड लगतच थोड्या अंतरावर शशिकांत खामकर यांनी त्यांच्या रानातील ऊसाची पाचट पेटवली होती. अकराच्या सुमारास वार्‍याच्या झोताने शेड व  रानामधील वाळके गवत पेटत शेडपर्यंत आले. लक्ष्मण खामकर यांनी तातडीने या शेडमधील तीन बैल, एक गाय वासरू यांना मोकळे केले. मात्र, एक बैल अंगाला व डोळ्याला भाजून जखमी झाला. दुसरीकडे घरात झोपलेली एक पाच वर्षाची नात व तीन वर्षांचा नातू यांना प्रसंगावधान राखत त्यांनी सुरक्षित बाहेर काढले. यामुळे मोठा अनर्थ टळला.

तिथे वैरणीसाठी रचलेल्या गवताच्या गंजीने व जनावरांच्या शेडने क्षणार्धात पेट घेतला. त्यामुळे इतर साहित्य वाचवणे त्यानां शक्य झाले नाही. जगन्नाथ खामकर, शशिकांत खामकर यांनी धावाधाव करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्‍न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही. या आगीची खबर मिळताच कुशी व आवर्डे गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचे प्रयत्न सुरू केले. गावातील पिण्याचे टाकीचे पाणी पाईपद्वारे आणून तसेच मिळेल ते साधनाने पाणी आणून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू होता. सुमारे तीन तास आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले जात होते. अखेर तीन पाण्याचे टँकर आल्यानंतरच आग आटोक्यात आली.

या आगीत जगनाथ खामकर यांचे सुमारे तीन ते चार हजार गवताच्या पेंड्या, स्प्रिंकलरच्या पाईप, जनावरांचे दोन पत्र्याचे शेड, लाकडी मांडव, जळण, शेणखत, पाण्याची टाकी, शेती उपयोगी अनेक अवजारे आदी साहित्य जळून सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले. घरातील साहित्य धनधान्य व मुले बचावली हेच काय ते समाधान. जळिताचा त्यांच्यावर हा दुसरा आघात झाला. मागील महिन्यातही नदीकाठी शॉर्टसर्किटने त्यांच्या दोन हजार गवताच्या पेंड्या जळल्या होत्या. या घटनेने खामकर कुटुंबीयांवर पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळला.

थ्री फेज लाईट नसल्याने शेजारीच असलेला शेती पंप सुरू करता आला नाही. अन्यथा त्या पाण्याद्वारे आगीवर लवकर नियंत्रण मिळविता आले असते आणि अधिकचे नुकसान टळले असते. त्याचबरोबर दैव बलवत्तर म्हणूनच दोन बालके यातून सुखरूप वाचली, अशी घटनास्थळी नागरिकांची चर्चा सुरू होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com