चार तालुक्‍यांत जमीन सुपीकतेला धोका

विकास जाधव
बुधवार, 31 जानेवारी 2018

काशीळ - पाणी व रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे माण, कऱ्हाड, खंडाळा, फलटण या तालुक्‍यांतील जमिनी किंचित विम्लधर्मीय होण्याच्या मार्गावर असल्याचे पाणी परीक्षण अहवालातून पुढे आले आहे, तर सातारा व पाटण तालुक्‍यांत नत्र व स्फुरदची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे. त्यामुळे या तालुक्‍यांत पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. 

काशीळ - पाणी व रासायनिक खतांच्या अतिरिक्त वापरामुळे माण, कऱ्हाड, खंडाळा, फलटण या तालुक्‍यांतील जमिनी किंचित विम्लधर्मीय होण्याच्या मार्गावर असल्याचे पाणी परीक्षण अहवालातून पुढे आले आहे, तर सातारा व पाटण तालुक्‍यांत नत्र व स्फुरदची कमतरता मोठ्या प्रमाणात दिसून आली आहे. त्यामुळे या तालुक्‍यांत पिकांच्या उत्पादनात घट होत आहे. 

जिल्ह्यातील कृषी विभागाकडील प्रयोगशाळेत एक हजार दहा गावांतील ७२ हजार ११४ माती नमुन्यांची तपासणी करण्यात आली. माण, कऱ्हाड, खंडाळा, फलटण तालुक्‍यांत मातीचा ‘सामू’ (पीएच) किंचित विम्लधर्मीय दिसत असल्याने पिकांना हानिकारक आहे. त्यात माण ९६.७१, कऱ्हाड ७४.४१, खंडाळा ९५.१३, फलटण ८६.६८ टक्के नमुन्यांमध्ये किंचित विम्लधर्मीय ‘सामू’त वाढ झाल्याचे दिसून येत आहे. जमीन व पिकांचे नियोजन करताना ‘सामू’ महत्त्वाचा असतो. जमीन आम्लधर्मी, अल्कधर्मी अथवा उदासीन असल्याची कल्पना ‘सामू’वरून येते. त्यानुसार आपल्या जमिनीत कोणती पिके व्यवस्थित येऊ शकतील, याचा अंदाज बांधणे शक्‍य होते. त्यानुसार पिकांचे व्यवस्थापन केले, तर अपेक्षित उत्पादन मिळण्यास अडचण येत नाही. सेंद्रिय, रासायनिक खतांचे विघटन, हवेतील नत्राचे स्थिरीकरण इत्यादी प्रक्रिया या जमिनीचा ‘सामू’ सहा ते आठ या दरम्यान असतानाच व्यवस्थित होतात, म्हणून जमिनीचा ‘सामू’ उदासीन राखणे गरजेचे असते. 

माण, कऱ्हाड, खंडाळा, फलटण तालुक्‍यांत ‘सामू’ वाढला आहे. या तालुक्‍यांतील जमिनीतून पाण्याचा निचरा होण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. सेंद्रीय व हिरवळीच्या खतांचा वापर वाढवावा. जमीन सुपीक राहण्यासाठी माती तपासणी अहवालानुसार रासायनिक खतांच्या मात्रा द्याव्यात.
- राजेंद्र पवार, जिल्हा मृद्‌चाचणी अधिकारी, सातारा 

सातारा, पाटण तालुके मागे 
सातारा तालुक्‍यातील आठ हजार १४१ नमुन्यांच्या तपासणीत नत्र व स्फुरदची उपलब्धता कमी, तर पालाशची उलब्धता मध्यम प्रमाणात असल्याचे स्पष्ट झाले. पाटण तालुक्‍यात सहा हजार ४४४ नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यातून नत्राचे प्रमाण कमी, स्फुरदचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र, पालाशचे प्रमाण या तालुक्‍यांत भरपूर आहे. कोरेगाव, खटाव, कऱ्हाड, वाई, जावळी, खंडाळा, फलटण, माण या तालुक्‍यांत मध्यम ते भरपूर प्रमाणात नत्र, स्फुरद, पालाश उपलब्ध असल्याचे अहवालावरून दिसत आहे.  एकूण, जिल्ह्याचे चित्र पाहता नत्र मध्यम, स्फुरद साधारण ते जास्त व पालाश हे भरपूर प्रमाणात असल्याचे अहवालातून स्पष्ट होते. जिल्ह्यात ९९.११ टक्के क्षेत्र सर्वसाधारण, ०.७६ टक्के उगवणीस हानिकारक, ०.११ टक्के क्षार संवेदनशील, ०.०२ टक्के नुकसानकारक आहेत. त्यावरून जिल्ह्यातील जमिनी क्षारपड होण्याचा धोका सध्या तरी कमी आहे.

Web Title: marathi news satara news land fertility