ओगलेवाडी काच कारखान्याची जमीन विकल्याप्रकरणी वकीलास अटक

सचिन शिंदे
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

श्री. कदम यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची बनावट सही व नाव या व्यवहारासाठी वापरण्यात आले होते. त्याप्रकरणात गायत्रीदेवी यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यात कोणत्याही प्रकरची सही अथवा खरेदीपत्राला परवानगी दिली आहे याचा त्यांनी स्पष्ट इनकार केला आहे. त्यामुळे गायत्रीदेवी यांचीही यामध्ये फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे.

औंध संस्थानिकांची बनावट सही करून व्यवहार झाल्याचे उघढ

कऱ्हाड : ओगलेवाडी  येथील ओगले काच कारखान्याच्या चौदा एकर जमिनीची बनावट कागदपत्रे तयार केल्या प्रकरणी येथील ज्येष्ठ वकीलास पोलिसांनी आज अटक केली. अ‍ॅड. विजय भगवान पाटील (रा. मंगळवार पेठ, कराड) असे त्यांचे नाव आहे. सुमारे पाच वर्षापूर्वी हजारमाचीचे पोलीस पाटील मुकुंद नामदेव कदम यांनी फिर्याद दिली होती. त्याप्रकरणात तब्बल पाच वर्षानी अ‍ॅड. पाटील यांना अटक झाली आहे. यामुळे शहरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी : ओगले काच कारखान्याला औंध संस्थानाने 99 वर्षांच्या करारने 1923 मध्ये 14 एकर 19 गुंठे जमिन नाममात्र भाडेतत्वाने दिली होती. ओगले काच कारखान्याच्या विसर्जनानंतर त्या जमिनीबाबत काही व्यवहार झाले. ते व्यवहार बनावट असल्याची फिर्याद मुकुंद नामदेव कदम यांनी न्यायालयात 7 जुलै 2012 रोजी दाखल केली. न्यायालयाने त्याच्या सखोल पोलीस तपासाचे आदेश दिले. ओगले काच कारखान्याची सिटी सर्व्हे नं. 44, 48, 49, 50, 51 याचे व्यवहार झाले आहेत. ते व्यवहार भूमि अभिलेख कार्यालयातील तत्कालीन अधिकारी विक्रम आण्णा सोनवणे यांच्याशी संगनमत करून झाले आहेत. त्यामुळे त्यांच्यावर आरोप आहे. त्यांनी त्याचवेळी अटकपूर्व जामिन घेतला आहे.

अ‍ॅड. पाटील यांनी केलेल्या व्यवहारामध्ये ओगले काच कारखान्याची या जागेवरची नोंद बनावट कागदपत्राद्वारे रद्द केली आहे. त्याप्रकरणात आमणे नावाच्या व्यक्तीची कागदपत्रे सादर करण्यात आली आहेत. ती गोष्ट पोलीस तपासात समोर आली आहे.

श्री. कदम यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांची बनावट सही व नाव या व्यवहारासाठी वापरण्यात आले होते. त्याप्रकरणात गायत्रीदेवी यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यात कोणत्याही प्रकरची सही अथवा खरेदीपत्राला परवानगी दिली आहे याचा त्यांनी स्पष्ट इनकार केला आहे. त्यामुळे गायत्रीदेवी यांचीही यामध्ये फसवणूक झाल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस यंत्रणा गेल्या पाच वर्षापासून करत आहे. त्यामध्ये अ‍ॅड. पाटील यांनी जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामिन अर्ज केला होता. तोही नामंजूर झाला आहे. आणखी तांत्रिक माहिती आल्यानंतर पोलिसांनी आज अ‍ॅड. पाटील यांना थेट अटक केली. त्यांना सायंकाळी फौजदारी न्यायालयात हजर करण्यात आले. त्यावेळी दि. 7 पर्यंत तीन दिवसांची पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायमूर्ती एस. एम. पाडोळीकर यांनी दिला आहे.  अ‍ॅड. विजय पाटील यांच्या विरोधात बनावट कागदपत्रे तयार करून फसवणूक केल्याचा आरोप ठेवण्यात आला.

Web Title: Marathi news Satara news in Marathi Ogalewadi glass factory issue