नगरसेवक बाळू खंदारेला मोका

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 16 मार्च 2018

सातारा - टोळीने दहशत माजवून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी खासगी सावकारी करणारा सातारा नगरपालिकेतील नगरविकास आघाडीचा नगरसेवक व जिल्हा नियोजन समिती सदस्य विनोद ऊर्फ बाळू खंदारे याच्यावर "मोका' कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यासोबत प्रमोद ऊर्फ खंड्या धाराशिवकर याच्यावरही "मोका'चा हा दुसरा गुन्हा दाखल झाला आहे. खंदारे हा आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा समर्थक आहे.

जिल्ह्यामध्ये दहशत निर्माण करून स्वत:च्या आर्थिक फायद्यासाठी खासगी सावकारी करणाऱ्या टोळ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी दिले आहेत. त्यानुसार खासगी सावकारांवर "मोका'अंतर्गत कारवाया झाल्या आहेत. त्यामध्ये पहिली कारवाई ही खंड्या धाराशिवकरच्या टोळीवर झाली. त्यामध्ये खंड्या धाराशिवकर अटकेत आहे. तो अटक झाल्यानंतर त्याच्या गुन्ह्यांची व टोळी सदस्यांची व्याप्तीही वाढत चालली आहे.

रहिमतपूर येथील व्यावसायिकाचा ट्रक वाळू वाहतुकीसाठी पकडला होता. तो सोडविण्यासाठी खंड्याने त्याला महिना दहा टक्के व्याजदाराने दोन लाख रुपये दिले होते. त्याबदल्यात त्याने वेळोवेळी दोन लाख 80 हजार रुपये परत दिले, तरीही त्याने त्याचे तीन ट्रक जबरदस्तीने नेले. हे प्रकरण मिटवतो, असे सांगत खंदारे व त्याचा चालक गणेश यांनी तक्रारदाराच्या मुलाला कोल्हापूरला नेऊन एक ट्रक दोन लाख रुपयांना विकायला लावला. त्यातील एक लाख 80 हजार रुपये स्वत:कडे घेतले.

खंड्या धाराशिवकर याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाल्यानंतर हा तक्रारदारही तक्रार देण्यासाठी शहर पोलिस ठाण्यात आला होता. तेव्हा खंदारे, सागर व अमोल जाधवने फिर्यादीच्या मुलास शहर पोलिस ठाण्यातून जबरदस्तीने बाहेर नेत तक्रार देण्यास मज्जाव केला होता.
याबाबत धाराशिवकर, खंदारे यांच्या टोळीवर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

या गुन्ह्याला "मोका'चे कलम लावण्यासाठी शहर पोलिस ठाण्याचे निरीक्षक नारायण सारंगकर यांनी पोलिस अधीक्षकांकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यांनी तो कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक विश्‍वास नांगरे- पाटील यांच्याकडे पाठविला. त्याला श्री. नांगरे- पाटील यांनी मंजुरी दिली आहे. त्यानुसार त्या गुन्ह्यामध्ये मोकाचे कलम वाढविण्यात आले आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपअधीक्षक (मुख्यालय) राजलक्ष्मी शिवणकर यांच्याकडे देण्यात आला आहे.

Web Title: marathi news satara news mokka on corporator balu khandare crime