नदाफ दाम्पत्याला मिळाली लाखमोलाची मदत

विशाल पाटील
रविवार, 11 फेब्रुवारी 2018

दानशूरांचे हात पुढे
'सकाळ'च्या बातमीची दखल घेत अमेरिका, बँकॉक यासहं राज्यभरातून नदाफ यांना फोन आले. काहींनी अन्नधान्य, मुलांना कपडे, शालेय साहित्य तर काहींनी रोख रक्कम देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. सुनील लोंढे यांनी सोलर दिला. सातारा येथील प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टचे डॉ. सुयोग दांडेकर, डॉ. श्रुती बोकरे, डॉ. महेश पवार यांनी या मुलांची तपासणी करून औषधोपचार केले. 

सातारा : तब्बल 24 अनाथ मुलांना आसरा देत त्यांचे पालन पोषण करणारे समीर आणि सलमा नदाफ दाम्पत्य या अनाथांचे आई- बाबा बनले. त्याची वस्तुस्थिती 'सकाळ'ने  'साथी हाथ बढाना' या सदरातून प्रथमच समोर आणली. त्याची दखल घेत सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या हस्ते कपडे, चादर, सोलर सिस्टिमचे वाटप केले. श्री. पाटील यांनी 'सकाळ'ने हे काम समाजासमोर आणल्याबद्दल विशेष अभिनंदन केले.

कऱ्हाड तालुक्यातील कोळे येथील समीर, सलमा नदाफ दाम्पत्य हे जिजाऊ बहुद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून अनाथ मुलांचा सांभाळ करत आहेत. ता. 30 जानेवारीला 'सकाळ'ने याची दखल घेत ही बातमी प्रसिध्द केली होती. त्यावेळी राज्यपाल श्रीनिवास पाटील यांनी सकाळच्या प्रतिनिधीशी संपर्क साधून याची माहिती घेतली होती.

श्री. पाटील हे कऱ्हाड दौऱ्यावर आले असून त्यांच्या येथील निवासस्थानी समीर नदाफ यांना गरम पाण्यासाठी सोलर सिस्टीम, चादर, कपडे देण्याचे नियोजन केले. खासदार शरद पवार हे कोल्हापूर दौरा उरकून कऱ्हाड येथे आले असता त्यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. 

नदाफ यांनी 25 एप्रिल 2015 पासून तीन अनाथ मुलांना सांभाळण्यास सुरुवात केली. सध्या त्यांच्या जवळ 24 अनाथ मुले आहेत. स्वतःच्या तीन मुलांप्रमाणे ते त्यांचा सांभाळ करत आहेत. अंगणवाडीत 6, पहिलीत 7, दुसरीत 3, तिसरीत 3, चौथीत 4, सातवीत 2 अशी मुले शिक्षण घेत आहेत. त्यांचा सांभाळ करण्यासाठी महिनाकाठी 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. 

समीर, सलमा यांनी गौरवास्पद काम सुरू केले आहे. त्याला हातभार लावण्यासाठी समाजाने पुढे आले पाहिजे. 'सकाळ' नेहमी सामाजिक उपक्रमात अग्रेसर असते. 'साथी हाथ बढाना' हे सदर सामाजिक जाणीवा पुढे आणत आहेत. 'सकाळ'ला धन्यवाद.
- श्रीनिवास पाटील, राज्यपाल, सिक्कीम.

दानशूरांचे हात पुढे
'सकाळ'च्या बातमीची दखल घेत अमेरिका, बँकॉक यासहं राज्यभरातून नदाफ यांना फोन आले. काहींनी अन्नधान्य, मुलांना कपडे, शालेय साहित्य तर काहींनी रोख रक्कम देऊन मदतीचा हात पुढे केला आहे. सुनील लोंढे यांनी सोलर दिला. सातारा येथील प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्टचे डॉ. सुयोग दांडेकर, डॉ. श्रुती बोकरे, डॉ. महेश पवार यांनी या मुलांची तपासणी करून औषधोपचार केले. 

Web Title: Marathi news Satara news Samir and Salma nadaf family