गुरुदेवांच्या स्वागताची लगीनघाई

सातारा - सैनिक स्कूलच्या मैदानावर असे भव्य व्यासपीठ, प्लॅटफॉर्म, महाकर्ण्यांची मालिका आदी व्यवस्था करण्यात आली आहे.
सातारा - सैनिक स्कूलच्या मैदानावर असे भव्य व्यासपीठ, प्लॅटफॉर्म, महाकर्ण्यांची मालिका आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने उद्या (बुधवारी) सैनिक स्कूलच्या मैदानावर श्री श्री रविशंकर यांच्या उपस्थितीत विविध उपक्रम होत आहेत. त्यातील युवाचार्य संमेलन व महासत्संग हे उपक्रम महत्त्वपूर्ण आहेत. त्याची साधकांनी जय्यत तयारी केलेली आहे. त्यानिमित्ताने...

सातारा - ताणतणाव मुक्त ‘लिव्हिंग’ची ‘आर्ट’ देणारे श्री श्री रविशंकर उद्या (बुधवार) येथे येणार असून, त्यांची आणि लाखोच्या संख्येने येणाऱ्या साधकांच्या स्वागताच्या तयारीची लगीनघाई उसळली आहे. साधक, कार्यकर्ते आपापल्यावर सोपविलेल्या कामांत गढून गेले आहेत. दरम्यान, प्रकाश झोतासाठी शेकडो हॅलोजन, गुरुदेवांचे शब्द अखेरच्या माणसांपर्यंत स्पष्ट पोचावेत, यासाठी ‘डिजे’तील महाकर्ण्यांची हवेत उभारलेल्या मालिका अन्‌ सैनिक स्कूलच्या मैदानवरील इंच अन्‌ इंच कार्पेटने झाकून कार्यक्रमाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. शहरासह जिल्ह्यात सर्वत्र साधकांनी लावलेल्या रविशंकर यांची पोस्टर, साधकांनी शहरातून नुकतीच काढलेली फेरी यामुळे वातावरण काहीसे जय गुरुदेवमय होऊन गेले आहे.

‘आर्ट ऑफ लिव्हिंग’चे श्री श्री रविशंकर हे उद्या येथे येत आहेत. जिल्ह्यात त्यांचे मोठ्या संख्येने सर्व क्षेत्रातील शिष्य साधक आहेत. उद्या सकाळी साडेदहा ते दुपारी एक या वेळेत निमंत्रितांसाठी ‘गुरू सान्निध्य कार्यक्रम’ होणार आहे. दुपारी दोन ते सायंकाळी पाच या वेळेत ‘युवा आचार्य संमेलन’ होणार आहे. यासाठी सैनिक स्कूलच्या मैदानावरील एका भागात भव्य शामियाना उभारण्यात आला आहे. तेथे साधकांना बसण्यासाठी कोचसह खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली आहे, तर मैदानाच्या दुसऱ्या भागात सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत होणाऱ्या महासत्संग कार्यक्रमासाठी भव्य व्यासपीठ, गुरुदेवांना साधकांच्या थेट गर्दीत पुढे जाता यावे यासाठी व्यासपीठाच्या उंचीचा प्लटफॉर्म उभारण्यात आला आहे. या कार्यक्रमात सर्वांना सहभागी होता येणार आहे. 

कार्यक्रम पश्‍चिम महाराष्ट्रात प्रथमच होत असल्याने या कार्यक्रमाबाबत साधकांतच नव्हे तर सामान्य नागरिकांतही मोठी उत्सुकता आहे. अगदी ग्रामीण भागातही कार्यक्रमांची पोस्टर लागलेली आहेत. साधक महिलांसह पुरुष कार्यकर्तेही कार्यक्रमासाठी झटत आहेत. 

नुकतीच येथे त्यांनी फेरीही काढली होती. उद्या साताऱ्यासह सांगली कोल्हापूर, सोलापूर येथूनही हजारोंच्या संख्येने साधक येणार आहेत. अनेक साधक आजच साताऱ्यात दाखल झाले आहेत. उद्या (बुधवार) मोठ्या संख्येने येणाऱ्या साधकांची प्रवेश, बैठक व्यवस्था याबाबत कोणतीही गौरसोय होऊ नये, यासाठी कार्यकर्ते धडपडत आहेत. अर्थातच उद्या कितीही गर्दी झाली तरी तणावमुक्त जीवन शैलीसाठी धडपडणारे कार्यकर्ते सर्व दक्षता घेणार हे नक्की. दरम्यान, या कार्यक्रमांची सर्वच नागरिकांत उत्सुकता वाढली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com