साताऱ्यातील वाहनांचे पासिंग कऱ्हाडला!

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 फेब्रुवारी 2018

साताऱ्यात वाहनांची नोंदणी केलेल्या वाहनधारकांनी पासिंगसाठी ठरलेल्या दिवशी सकाळी साडेसात वाजता कऱ्हाड उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात उपस्थित राहावे.’
- संजय धायगुडे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सातारा

सातारा - वाहन तपासणीसाठी ट्रॅक उपलब्ध नसल्याने पासिंग थांबू नये, यासाठी कऱ्हाड येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहनांची चाचणी घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सातारा कार्यालयातील दोन अधिकाऱ्यांची कऱ्हाड कार्यालयात नेमणूक करण्यात आली आहे.

उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कारभारातील त्रुटींसंदर्भात २०१३ मध्ये एक जनहित याचिका उच्च न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान १४ सप्टेंबर २०१७ रोजी उच्च न्यायालयाने एक आदेश दिला होता. त्यानुसार सार्वजनिक रस्त्यावर ब्रेक टेस्ट घेऊन वाहनांना योग्यता प्रमाणपत्र देण्याच्या पद्धतीला निर्बंध आणण्यात आले होते. राज्यातील ज्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयांत अशा पद्धतीने योग्यता प्रमाणपत्रासाठीची चाचणी सार्वजनिक रस्त्यांवर घेतली जात होती, त्यांना ३१ जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली होती. या कालावधीत संबंधित उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात ‘टेस्ट ट्रॅक’ तयार करणे आवश्‍यक होते. येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला ते शक्‍य झाले नाही.

त्यामुळे एक फेब्रुवारीपासून येथील वाहनांच्या पासिंगची प्रक्रिया बंद झाली आहे.

वाहनचालकांच्या सोयीसाठी उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने कऱ्हाड कार्यालयात वाहनांची चाचणी घेण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय धायगुडे यांनी कोल्हापूर येथील परिवहन आयुक्तांकडे केली होती. ती मागणी पूर्ण करण्यात आली आहे. त्यानुसार कऱ्हाड कार्यालयात वाहनांची चाचणी होणार आहे. त्यासाठी वाहनचालकांना सातारा कार्यालयातून ना हरकत प्रमाणपत्र मिळणार आहे. त्यासाठी वाहनचालकांना ऑनलाइन नोंदणी करावयाची आहे, तसेच ऑनलाइन किंवा सातारा कार्यालयात शुल्क भरावयाचे आहे. 

वाहनांच्या तपासणीसाठी सातारा कार्यालयातील एक वाहन निरीक्षक व एका सहायक वाहन निरीक्षकाची कऱ्हाड कार्यालयात नेमणूक करण्यात आली आहे. कऱ्हाड येथे सांगली उपप्रादेशिक परिवहन कार्यालयातील वाहनेही तपासणीसाठी येणार आहेत. त्यामुळे सध्या सातारा कार्यालयात नोंदणी केलेल्या केवळ २५ वाहनांची दररोज तपासणी होणार आहे. कऱ्हाड येथील कामकाज सुरळीत झाल्यावर ही संख्या वाढविण्यात येणार असल्याचे श्री. धायगुडे यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

Web Title: marathi news satara news vehicle passing karad