शंभुराज देसाई यांनी समोर येण्याचे आव्हान देऊ नये: पाटणकर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 10 जानेवारी 2018

मी तालुक्यात नविन घाट, रस्ते निर्माण केले त्यावर मलमपट्टी करताना शेकडो कोटीच्या बाता मारणे याला विकास म्हणत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत खड्डे भरणे व डांबरीकरणाचा दुसरा थर देणे अशी कामे दरवर्षी केली जातात.

पाटण (जि. सातारा) : सभ्य आणि सुसंस्कृत माणसाबरोबर व ज्याला तालुक्यातील जनतेची काळजी आहे अशा विभुतींशी मला वैचारिक वाद घालणे नक्की आवडेल. मी सलग सहा वेळा निवडुन आलो आहे. सलग दोन वेळा निवडुन येताना अपयश आलेल्या आमदार शंभुराज देसाई यांनी मला समोरा समोर येण्याचे आव्हान देऊ नये. वेळोवेळी जाहिर केलेले प्रकल्प उभे करुन दाखवा मग मला समोरासमोर येण्याचे आव्हान पोलादी पुरुषाचे नातु शंभुराज देसाई यांनी द्यावे असे आवाहन माजीमंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिले.

मी तालुक्यात नविन घाट, रस्ते निर्माण केले त्यावर मलमपट्टी करताना शेकडो कोटीच्या बाता मारणे याला विकास म्हणत नाहीत. सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन विशेष दुरुस्ती कार्यक्रमांतर्गत खड्डे भरणे व डांबरीकरणाचा दुसरा थर देणे अशी कामे दरवर्षी केली जातात. ती व्यवस्थीत करुन घ्या. मी केलेल्या कामाची तुलना करु नका असा आरोप करुन श्री. पाटणकर पुढे म्हणाले, नेहरु गार्डन, पवन उर्जा प्रकल्पासारखे प्रकल्प उभे करुन दाखवा नुसत्या वर्तमान पत्रात बातम्या दिल्या व घोषणावर घोषणा केल्या की विकास होतो हे जनतेला सांगायचा केविलवाणा प्रयत्न सोडा.

छोट्या-मोठ्या संस्था उभ्या करण्याचे तुम्हाला २५ वर्षात जमले नाही. साखर कारखान्याची इंचभरही प्रगती आपल्या कर्तत्वात झाली नाही व ज्यांना तालुक्यातील प्रस्नच माहित नाहीत त्यांना शहाणपणा सांगुन काहीही उपयोग नाही. मात्र राजकारणात प्रवेश केल्यापासुन विकास कामांची खोटी आकडेवारी व त्याच घोषणांना जनता आता कंटाळली आहे. २०० व ५०० मीटर रस्त्यांच्या कामाचे भुमिपुजन घ्यायचे व पाटणकरांवर आरोप करायचे हा एक कलमी कार्यक्रम आतातरी बंद करा.
ढेबेवाडी विभागातील खळे येथील बंधाऱ्याचा पाया पुर्वीच भरला असुन अपुर्ण काम पुर्ण करायला तीन वर्षात वेळ न मिळालेले आमदार याचा कामाचे तिसऱ्यावेळी भुमिपुजन करत आहेत. भुमिपुजन केले म्हणजे मोठा पराक्रम केला काय. मी तीन वर्षापुर्वी विधानसभा निवडणुक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे तरी माझी एवढी धडकी का भरली आहे. लोकनेत्यांचा व पोलादी पुरुषाचा नातु एवढा भित्रा निघाला हा संशोधनाचा विषय आहे. शिवाजीराव देसाई मेमोरियल हॉस्पीटल, आसवनी, को-जनरेशन व इथेनॉल प्रकल्पाच्या घोषणा केल्या ते हवेत उडाले का याची माहिती जनतेला द्या व मगच समोरासमोर येण्याचे आव्हान द्या असे शेवटी श्री. पाटणकर म्हणाले. 

Web Title: Marathi news Satara news Vikramsingh Patankar statement