पोलिस पाटलांना बंदुकीचे परवाने देण्याची गरज: विश्‍वास नांगरे-पाटील

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 3 फेब्रुवारी 2018

‘तुम्हाला सडक सख्याहारी, मद्यपी आणी खासगी सावकारांचा त्रास होतोयं का शाळेत येता-जाताना आणी बाहेर फिरताना असुरक्षित वाटतयेयं का असे सवाल करीत नांगरे-पाटील यांनी उपस्थित विद्यार्थीनी आणि महिलांशी संवाद साधत त्यांना बोलते केले. ‘आम्हाला असा कोणताही त्रास जाणवत नसल्याचे उपस्थितांनी सांगितल्यावर, त्यांनी ‘येथे क्राईमही कमी आहे त्यामुळे पोलिस ठाणेच बंद करू या का असे मिश्कीलपणे विचारल्यावर उपस्थितांमध्ये हशां पिकला.

ढेबेवाडी (ता. पाटण, जि. सातारा) : गावच्या संरक्षणासाठी पोलिस पाटलांना बंदुकीचे परवाने आणि आवश्यक प्रशिक्षण देवून पोलिसांप्रमाणे त्यांनाही सक्षम बनविण्याची गरज असल्याची माहिती विशेष पोलिस महानिरिक्षक विश्‍वास नांगरे-पाटील यांनी आज येथे आयोजित जनसंवाद कार्यक्रमात दिली. सातारा जिल्ह्यात नव्याने भरती झालेल्या पोलिस पाटलांना कर्तव्यांची जाणीव करून देणारे प्रशिक्षण तातडीने आयोजित करण्याची सुचनाही त्यांनी यावेळी केली. 

येथील पोलिस ठाण्याच्या तपासणीच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या जनसंवाद कार्यक्रमास उपविभागीय पोलिस आधिकारी निता पाडवी, पोलिस उपअधिक्षक राणे, पोलिस निरिक्षक पदमाकर घनवट, सहाय्यक पोलिस निरिक्षक स्वप्निल लोखंडे आदींसह विविध गावातील पदाधिकारी, नागरिक,पोलिस कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते. 

‘तुम्हाला सडक सख्याहारी, मद्यपी आणी खासगी सावकारांचा त्रास होतोयं का शाळेत येता-जाताना आणी बाहेर फिरताना असुरक्षित वाटतयेयं का असे सवाल करीत नांगरे-पाटील यांनी उपस्थित विद्यार्थीनी आणि महिलांशी संवाद साधत त्यांना बोलते केले. ‘आम्हाला असा कोणताही त्रास जाणवत नसल्याचे उपस्थितांनी सांगितल्यावर, त्यांनी ‘येथे क्राईमही कमी आहे त्यामुळे पोलिस ठाणेच बंद करू या का असे मिश्कीलपणे विचारल्यावर उपस्थितांमध्ये हशां पिकला. 

ते म्हणाले,‘गावचे संरक्षण गावानेच केले पहिजे त्यासाठी एकजूट कायम ठेवा.वाईट प्रवृत्ती आणी गुंडगिरी तोंड वर काढत असतानाच वेळीच पोलिसांच्या मदतीने त्यावर नियंत्रण ठेवा. दरोडे व इतर प्रसंगात गावचे संरक्षण करण्यासाठी पोलिसांप्रमाणे पुरूष पोलीस पाटलांकडेही बंदुक आणी महीला पोलिस पाटलांकडे पिस्तुल देवून त्यांना सक्षम करायला पाहीजे. सातारा जिल्ह्यात नव्याने भरती झालेल्या पोलिस पाटलांना कर्तव्यांची जाणीव करून देणारे प्रशिक्षण तातडीने आयोजित करण्यात येईल. येथील पोलिस ठाण्याला आयएसओ ए डबलप्लस मानांकन मिळाले असून गुन्हेगारीवर चांगले नियंत्रण दिसून येत आहे. पोलिसांचे काम फक्त दांडके आणी कायद्याने होत नाही तर त्यासाठी विश्‍वास आणी सुसंवाद निर्माण होण्याची गरज असते.‘ यावेळी चांगल्या कामकाजाबद्दल येथील पोलिस ठाण्यातील सहाय्यक पोलिस निरिक्षक लोखंडे व पोलिस कर्मचार्‍यांना बक्षिसे जाहीर करण्यात आली. 

राधा पांढरपट्टे, अर्पिता पाटील, शुभदा पाटील, प्रज्ञा पवार, रामदास विगावे, संजय लोहार, दादा कडव, पी. जी. जंगानी, प्राचार्य जे. एस. आत्तार, लालासाहेब पाटील, राजू लोहार, शेखर लोखंडे, आत्माराम पाचुपते, विलास गोडांबे, सतीश कचरे आदींनी कार्यक्रमात प्रश्‍न मांडले. येथील बाजारतळावरील देशीदारूच्या दुकानाबद्दल तक्रार केल्याने तातडीने त्यासंदर्भात आवश्यक कार्यवाही करण्याची सुचना नांगरे-पाटील यांनी आधिकार्‍यांना केली. 

Web Title: Marathi news Satara news Vishwas Nangre Patil statement