शाहूपुरीतील गळत्यांना जबाबदार कोण?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 फेब्रुवारी 2018

गेल्या दीड वर्षापासून बंद असलेले कण्हेर पाणीपुरवठा योजनेचे काम त्वरित सुरू करावे. ही योजना मार्गी लागल्यास बेकायदा कनेक्‍शन, जलवाहिन्यांच्या गळत्या, अपुरा व कमी दाबाने पाणीपुरवठा, दूषित पुरवठा, साथरोग हे सर्व प्रश्‍नच निकाली निघतील.
- भारत भोसले, माजी सरपंच, शाहूपुरी.

सातारा - पिण्यास अयोग्य पाणी असल्याचा अहवाल प्राथमिक आरोग्य केंद्राने आठवड्यापूर्वी देऊनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. परिणामी शाहूपुरीत कावीळ साथीने हातपाय पसरले. शाहूपुरीतील जलवाहिन्यांच्या गळत्या, सांडपाण्यातून गेलेल्या जलवाहिन्या याला जबाबदार कोण? आणखी किती वर्षे शाहूपुरीच्या नव्या पाणीयोजनेस लावणार आहात, असा सवाल शाहूपुरीवासीय करत आहेत. 

घरी आलेल्या पाहुण्याला तांब्या भांड्यातून नव्हे तर भांड्यातून पाणी दिले जायचे, इतका शाहूपुरीत पाण्याचा दुष्काळ होता. वस्ती वाढली, सुधारणा झाल्या तरी शाहूपुरीतील पाणीप्रश्‍न काही मिटला नाही. कण्हेर योजनेला मंजुरी मिळाली. त्यामुळे आतातरी मुबलक पाणी मिळेल, या रहिवाशांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे. शाहूपुरीत काविळीच्या साथीने डोके वर काढल्याने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. गेल्या महिन्याभरात शाहूपुरीत काविळीच्या साथीने बाधितांनी ५० चा आकडा कधीच ओलांडला आहे. 

शाहूपुरी चौकाजवळ प्राधिकरणाने दुरुस्तीसाठी खड्डा खोदला होता. काम झाल्यानंतर तो तसाच सोडून देण्यात आला. याच खड्ड्यात पाणी साचून ते जलवाहिन्यांमध्ये मिसळत आहे. शाहूपुरी भागात अनेक ठिकाणी अशीच परिस्थती आहे. गटारांतून गेलेल्या जलवाहिन्यांमध्ये कधी सांडपाणी मिसळेल याचा नेम नाही. त्यात पीव्हीसी पाइप वापरल्या असल्यामुळे त्या फुटायला फारसा वेळ लागत नाही. 

नागरिकांच्या तक्रारीवरून कण्हेर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी शाहूपुरीतील पाण्याचे पाच नमुने ‘ओटी’ चाचणीसाठी नेले होते. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात त्याचा अहवाल आला. या पाचपैकी चार नमूने दूषित आढळले. हे पाणी पिण्यासाठी अयोग्य असल्याचा लेखी अहवाल प्राथमिक आरोग्य केंद्राने जीवन प्राधिकरणाला दिला आहे, तरीही प्राधिकरणाने शाहूपुरीतील जलवाहिन्यांची गळती काढण्याची तसदी घेतली नाही. शाहूपुरी विकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी प्राधिकरणाला इशारा दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी धावती भेट दिली. प्राथमिक आरोग्य केंद्राने ‘पिण्यास अयोग्य’ असे सांगितले असतानाही नागरिकांना सांडपाण्यातून येणाऱ्या जलवाहिन्यांवरील नळाचेच पाणी प्यावे लागले याला जबाबदार कोण, असा सवाल शाहूपुरीवासीय विचारू लागले आहेत.

Web Title: marathi news satara news water leakage responsiblity