वाघ म्हणतोय, 'निसर्ग नाही, तुमचं बघा!' 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

कास स्वच्छता मोहिमेमध्ये आज सदरबझारमधील नलिनी कला निकेतनच्या चित्रकारांनी यवतेश्वर घाटात श्रमदान केले. या घाटातील दर्शनी दगड आणि भिंतीवर निकेतनच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग जपण्याचा, प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देणारी चित्रे व घोषवाक्‍ये रेखाटली. 

सातारा : 'निसर्ग वाचवा, सेव्ह वाईल्ड लाइफ' अशी घोषवाक्‍ये आपण नेहमीच पाहतो; यवतेश्वरच्या घाटात वाघच म्हणतोय, 'निसर्ग वाचवायचं राहू द्या, आधी तुमचं बघा!' 'सकाळ'च्या कास स्वच्छता मोहिमेअंतर्गत चित्रकारांनी निसर्ग जागृतीपर दिलेले संदेश लक्ष वेधून घेत आहेत. कास स्वच्छता मोहिमेमध्ये आज सदरबझारमधील नलिनी कला निकेतनच्या चित्रकारांनी यवतेश्वर घाटात श्रमदान केले. या घाटातील दर्शनी दगड आणि भिंतीवर निकेतनच्या विद्यार्थ्यांनी निसर्ग जपण्याचा, प्लॅस्टिक मुक्तीचा संदेश देणारी चित्रे व घोषवाक्‍ये रेखाटली. 

कास स्वच्छता मोहिमेमध्ये या चित्रकारांनी वाढत्या उन्हाची पर्वा न करता चित्रे रेखाटून आपल्याकडे असलेले कौशल्य पणाला लावून श्रमदान केले. सकाळी सात वाजता नलिनी कला निकेतनच्या श्वेता जंगम यांच्या नेतृत्वाखाली विद्यार्थ्यांनी रंग व ब्रश घेऊन जनजागृती करून श्रमदान सुरू केले. दुपारी 12 वाजता आजच्या कामाची सांगता झाली. 

save tiger team satara

श्रमदानात पूर्वी कुलकर्णी, धनवी जोशी, अपूर्वा राजे, ऐश्वर्या घोरपडे, गौरी बर्गे, ऋतुजा पुजारी, कृष्णा बारटक्के, अभिजित घाडगे, श्रेयस गोगावले, श्वेता जंगम, आरोही कदम, क्षितीज महाजनी, रोहित जगदाळे, निमितेश घोडके, देवेन शहाणे, स्वराली सगरे, अमोल दरडी, अभिषेक बारटक्के, सुमित महाडिक सहभागी झाले होते. त्यांना नलिनी कला निकेतनचे संचालक शेखर हसबनीस यांनी मार्गदर्शन केले. केवळ साफसफाई करणे हा मोहिमेचा उद्देश नाही. स्वच्छ कास आणि शुद्ध हवा राखणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कासच्या स्वच्छतेत स्वयंसेवी पद्धतीने योगदान देऊ इच्छिणाऱ्या नागरिकांनी शैलेन्द्र पाटील, 9881133085 यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: marathi news satara save tiger campaign painting students