अतिदुर्गम शाळांत महिलांना सूट? 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जानेवारी 2018

सातारा - गेल्या शैक्षणिक वर्षात अनेक कारणांनी खोळंबलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांनी वेग घेतला आहे. ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी घेतलेल्या आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अतिदुर्गम असलेल्या कोणत्या शाळांत महिलांना जाणे शक्‍य नसल्यास त्याची यादी द्यावी, तसेच कोणत्याही जिल्ह्यात दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पदे रिक्‍त राहणार याची दक्षता घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. 

सातारा - गेल्या शैक्षणिक वर्षात अनेक कारणांनी खोळंबलेल्या प्राथमिक शिक्षकांच्या आंतरजिल्हा आणि जिल्हांतर्गत बदल्यांनी वेग घेतला आहे. ग्रामविकास विभागाचे सचिव असिम गुप्ता यांनी घेतलेल्या आजच्या व्हिडिओ कॉन्फरन्समध्ये अतिदुर्गम असलेल्या कोणत्या शाळांत महिलांना जाणे शक्‍य नसल्यास त्याची यादी द्यावी, तसेच कोणत्याही जिल्ह्यात दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त पदे रिक्‍त राहणार याची दक्षता घेण्याच्या सूचनाही दिल्या आहेत. 

राज्याच्या ग्रामविकास विभागाने 2018-19 हे शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्याचे नियोजन केले आहे. त्यासंदर्भात नऊ जानेवारीला राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र देऊन बदल्यांची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, ग्रामविकास विभागाने दिलेल्या या पत्राकडे गांभीर्याने पाहिले गेले नाही. त्यानंतर ता. 19 जानेवारीला या प्रक्रियेकडे दुर्लक्ष करणाऱ्या केंद्र प्रमुखांच्या दोन वेतनवाढी रोखण्याचे आदेश ग्रामविकास विभागाने दिले. या निर्णयाला दहा दिवसांचा कालावधी लोटला आहे. संचमान्यतेची प्रक्रिया पूर्ण करून अतिरिक्त झालेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यासही सांगितले आहे. मात्र, तीही कार्यवाही पूर्ण झालेली नाही. 

जिल्हांतर्गत, आंतरजिल्हा बदल्यांबाबत श्री. गुप्ता यांनी आज दुपारी राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यामध्ये त्यांनी बदली प्रक्रियेला गती देण्याचे आदेश दिले आहेत. आंतरजिल्हा बदलीसाठी एक, जिल्हांतर्गत बदलीसाठी ता. 15 फेब्रुवारीपर्यंत तयारी करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहे. त्यामुळे शिक्षण विभागाला बदली अधिकार प्राप्त, बदली पात्र शिक्षकांच्या यादी प्रसिद्ध करावी लागणार आहे, तसेच सर्वसाधारण क्षेत्र व अवघड क्षेत्रातील शाळांचे मॅपिंग करण्याचे काम युद्ध पातळीवर करावे लागेल. 

कोणत्याही जिल्ह्यांत दहा टक्‍क्‍यांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्‍त राहता कामा नयेत, यासाठी शिक्षण विभागाने तत्काळ आढावा द्यावा, त्यानुसारच आंतरजिल्हा बदल्या कराव्यात, त्यानंतर जिल्हांतर्गत बदल्यांची कार्यवाही करावी, दुर्गम शाळांमध्ये काही शाळा अतिदुर्गम भागात आहेत. तेथे महिला शिक्षकांना जाणे मुश्‍कील असते. अशा शाळांची यादी श्री. गुप्ता यांनी मागविली आहे. त्यामुळे महिला शिक्षिकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्‍यता आहे. 

सातारा जिल्हा परिषदेमुळे बदल 
गेल्या वर्षी झालेल्या आंतरजिल्हा बदलीमधून सातारा जिल्हा परिषदेत दाखल झालेल्या महिला शिक्षिकांचे समायोजन करताना दुर्गम शाळांमध्ये सूट दिली गेली नव्हती. त्यांच्या अडचणी जाणून घेत तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी श्री. गुप्ता यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्यानुसार 26 शिक्षिकांचे फेर समायोजन झाले होते. तोच प्रकार पुन्हा होऊ नयेत, यासाठी श्री. गुप्ता यांनी महिलांची अत्यंत गैरसोय होऊ नये, याची दक्षता घेण्याच्या सूचना दिल्या आहेत.

Web Title: marathi news satara school women