क्रीडा संकुलाचे काम गतीने करण्याचा निर्धार 

क्रीडा संकुलाचे काम गतीने करण्याचा निर्धार 

वडूज - येथील रखडलेल्या तालुका क्रीडा संकुलाचे काम येत्या दोन महिन्यांत गतीने पूर्ण करण्याचा निर्धार क्रीडा संकुल समितीच्या बैठकीत करण्यात आला. याबाबत "सकाळ'ने तालुका क्रीडा संकुलाच्या रखडलेल्या कामाची व मंजूर निधी पडून राहिल्याबद्दलचे वृत्त मांडले होते. तहसीलदार कार्यालयात याबाबत बैठक झाली. यावेळी विशेष निमंत्रित सदस्य, माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, तहसीलदार सुशील बेल्हेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी सुहास पाटील, सहायक सुनील धारावकर, गटशिक्षणाधिकारी लक्ष्मणराव पिसे, मुख्याधिकारी माधव खांडेकर, पोलिस निरीक्षक यशवंत शिर्के, उपअभियंता संभाजीराव जाधव, शाखा अभियंता श्री. लंगोटे, विस्तार अधिकारी श्री. माने, आर्किटेक्‍चर उदयन कुलकर्णी, सदस्य आर. एन. पवार, प्रा. प्रमोद राऊत, गोविंद भंडारे उपस्थित होते. बैठकीच्या सुरवातीलाच क्रीडा अधिकारी श्री. पाटील यांनी आतापर्यंत झालेल्या कामाचा आढावा दिला. त्यावेळी बांधकाम खात्याच्या अनास्थेमुळे तांत्रिक मंजुरी व इतर बाबींमध्ये अडचणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित झाला. त्यावर डॉ. येळगावकर यांनी तातडीने अधीक्षक अभियंता माने यांच्याशी भ्रमणध्वणीवरून संपर्क साधला. त्यानंतर काही वेळाने उपअभियंता संभाजीराव जाधव कामाची अंदाजपत्रके घेऊनच हजर झाले. वीज वितरण कंपनीने क्रीडा संकुलास सवलत दराने वीज देण्याबाबतही यावेळी चर्चा झाली. यासंबंधात अधीक्षक अभियंता श्री. साळे यांच्याशी संपर्क करण्यात आला. क्रीडा संकुलास येणाऱ्या अतिक्रमणाच्या अडचणीबाबत तहसीलदार श्री. बेल्हेकर व पोलिस निरीक्षक श्री. शिर्के यांनी समन्वयातून तोडगा काढावा अशी सूचना डॉ. येळगावकर यांनी यावेळी केली. 

खिडक्‍यांच्या काचा फोडणे, किरकोळ चोऱ्यांच्या प्रकाराबाबत ठेकेदार श्री. भंडारे यांनी मुद्दा उपस्थित केला. त्यावर शासकीय सुरक्षा रक्षक नेमण्यासंदर्भात पत्रव्यवहार करण्याची सूचना डॉ. येळगावकर यांनी केली. यावेळी संरक्षक भिंत व अन्य उर्वरित कामासाठी नगरोत्थान विकास योजनेतून निधी मिळविण्याबरोबर सिंथेटिक कोर्टाचा 20 लाख रुपयांचा निधी संरक्षक भिंतीसाठी वापरण्याचा ठरावही करण्यात आला. गोपूज येथील ग्रीन पॉवर शुगर्स कारखाना, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया आदींच्या सी. एस. आर. फंडातून मदत मागविणे, जे. सी. बी. मशिनधारक व अन्य मोठ्या ठेकेदारांच्या सहकार्यातून मातीचा प्रश्‍न सोडविणे आदींबाबत चर्चा झाली.  श्री. राऊत यांनी आभार मानले. 

दै. "सकाळ' ला धन्यवाद  
तालुका क्रीडा संकुलातील संरक्षक भिंत, रनिंग ट्रॅक, खेळांची मैदाने या कामांसाठी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. मात्र, ही कामे पूर्ण होत नसल्याबद्दल "सकाळ' ने आवाज उठविला होता. त्याची दखल घेऊन प्रशासनाने संकुल परिसराची पाहणी केली. त्यानंतर बैठक घेऊन संकुलाच्या कामाला गती देण्याचे ठरविल्यामुळे खेळाडू व क्रीडाप्रेमींकडून "सकाळ'  ला धन्यवाद दिले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com